(सप्टेंबर १९०९)

देशभक्ती आणि राष्ट्रीय चेतना हे दोन विभिन्न गुण आहेत. देशभक्त त्याच्या मातृभूमीच्या सेवेच्या हर्षोन्मादामध्ये जीवन जगत असतो, तो तिचे सर्वत्र दर्शन घेतो, तो तिच्याकडे देवता म्हणून पाहतो. देशाच्या कल्याणासाठी केलेला यज्ञ या दृष्टिकोनातून तो त्याचे सर्व कार्य अर्पण करतो; त्याचे स्वत:चे हित हे देशाच्या हितामध्ये मिसळून गेलेले असते. एकोणिसाव्या शतकातील इंग्लिश लोकांमध्ये अशी भावना नव्हती कारण कोणत्याही पाश्चात्त्य ‘भौतिकतावादी’ राष्ट्रातील व्यक्तीच्या हृदयात कायमस्वरूपी ह्या भावना घर करून राहू शकत नाहीत. ‘इंग्रज’ भारतात आले ते त्यांच्या देशाच्या भल्यासाठी म्हणून नव्हे तर ते व्यापार करायला इथे आले, स्वत:साठी पैसा मिळवायला इथे आले. स्वत:च्या देशाविषयीच्या प्रेमापोटी त्यांनी भारत जिंकून घेतला नाही किंवा त्याची लूट केली नाही तर त्यांनी स्वत:च्या स्वार्थापोटी भारतावर विजय मिळविला. असे असूनदेखील, देशभक्ती नसूनसुद्धा, त्यांच्याजवळ राष्ट्रीय भावना होती; त्यांच्याजवळ एकप्रकारचा अभिमान होता की, “आमचा देश सर्वोत्तम आहे, आमच्या रीतीपरंपरा, आमचा धर्म, आमचे चारित्र्य, नैतिकता, सामर्थ्य, धैर्य, बुद्धिमत्ता, आमची मते आणि आमच्या देशाचे कार्य हे इतरांना ज्याचे अनुकरणही करता येणार नाही इतके परिपूर्ण आहे, इतके ते अप्राप्य आहे,” ते असा विश्वास बाळगत की, “माझ्या देशाच्या हितामध्ये माझे हित सामावलेले आहे, माझ्या देशाचे वैभव हे माझे वैभव आहे, माझ्या देशबांधवांची समृद्धी ही माझी समृद्धी आहे; केवळ माझ्याच वैयक्तिक उद्दिष्टांसाठी धडपडण्याऐवजी, त्याचबरोबर मी माझ्या राष्ट्राच्या हितासाठीदेखील प्रगत होईन; देशाचा सन्मान, त्याचे वैभव, त्याची समृद्धी ह्यासाठी झगडणे हे त्या देशाच्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे; हाच नायकाचा धर्म आहे; आणि गरज पडली तर या लढ्यामध्ये वीरमरण पत्करणे हाच त्याचा धर्म होय.” या कर्तव्य – भावनेमधून राष्ट्रीय चेतनेचे मुख्य वैशिष्ट्य दिसून येते. देशभक्ती ही प्रकृतीने सात्त्विक असते, तर राष्ट्रीय चेतना ही राजसिक असते. जी व्यक्ती स्वत:चा अहं हा देशाच्या ‘अहं’मध्ये विरघळवून टाकते ती आदर्श देशभक्त असते; स्वत:विषयी अहंकार बाळगत असतानादेखील जी व्यक्ती देशाच्या अस्मितेचाही परिपोष करत असते ती व्यक्ती राष्ट्रभान असणारी व्यक्ती असते. त्या काळातील भारतीयांमध्ये अशा राष्ट्रभानाची आवश्यकता होती. आमचे असे म्हणणे नाही की, त्यांना देशहिताची कधीच पर्वा नव्हती; पण जर का त्यांचे व्यक्तिगत हित आणि देशहित यांमध्ये यत्किंचित जरी संघर्ष निर्माण झाला तर ते नेहमी स्वहितासाठी देशहिताचा त्याग करत असत. आमच्या मते, एकात्मतेच्या अभावापेक्षाही अधिक घातक असा जर कोणता दोष असेल तर तो राष्ट्रीय चेतनेचा अभाव हा होय. मात्र संपूर्ण देशभरामध्ये जर सर्वत्र ही राष्ट्रीय चेतना पसरली तर, ही भूमी भेदाभेदांनी पिडीत झालेली असली तरीसुद्धा एकात्मता अनुभवेल.

– श्रीअरविंद
(CWSA 09 : 218-219)

श्रीअरविंद