(इसवी सन : १९०७-१९०८)

राष्ट्र म्हणजे काय? आम्ही पाश्चात्त्य देशांमधील शाळांमध्ये शिकलो आहोत आणि स्वत:च्या सखोल संकल्पना, अधिक सत्य असणारी वाणी विसरून पाश्चात्त्यांची भाषा, त्यांचे विचार यांचे अनुकरण करावयास शिकलो आहोत. पाश्चात्त्यांच्या लेखी, राष्ट्र म्हणजे देश, अमुक एवढ्या जमिनीवर वास्तव्य करणारी काही लाख माणसं, की जी एकच भाषा बोलतात, त्यांनी निवडलेल्या एकाच नियामक सत्तेशी एकनिष्ठ राहत, एकसारखेच राजकीय जीवन जगत राहतात. परंतु, भारताची राष्ट्रीयतेची कल्पना अधिक सत्य आणि अधिक सघन असावयास हवी.

आपल्या पूर्वजांनी तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिले तेव्हा त्यांना वस्तुमात्रांचा एक स्थूल देह दिसला, त्याच्या आत असणाऱ्या सूक्ष्म देहाचा शोध त्यांना लागला, त्याच्याही पलीकडे जात, त्याच्याही पलीकडे अजून एका अधिक खोलवर दडून असलेल्या आणि तिसऱ्या देहाच्याही आतमध्ये असलेला, जीवनाचा आणि त्याच्या रूपाचा ‘स्रोत’ सदासाठी, अचल आणि अविनाशी अशा स्वरूपात तेथे स्थित आहे असे त्यांना आढळून आले. जे व्यक्तित्वाबाबत सत्य आहे तीच गोष्ट सामान्यत: आणि वैश्विक स्तरावर देखील सत्य आहे. जे माणसाबाबत सत्य आहे अगदी तेच राष्ट्राबाबतही सत्य आहे.

देश, जमीन हा राष्ट्राचा केवळ बाह्यवर्ती देह, त्याचा ‘अन्नमय कोश’ असतो, किंवा त्याला स्थूल शारीरिक देह असे म्हणता येईल. माणसांच्या समुहांमुळे, समाजामुळे, लाखो लोकांमुळे राष्ट्राचा हा देह व्यापून जातो आणि ते सारे केवळ त्यांच्या अस्तित्वांद्वारेच या देहामध्ये प्राणाची फुंकर घालतात, तो हा ‘प्राणमय कोश’, म्हणजे राष्ट्राचा प्राणदेह होय. हे दोन्ही देह स्थूल आहेत, ‘माते’चे ते भौतिक आविष्करण असते. स्थूल देहामध्ये सूक्ष्म देह असतो, विचार, साहित्य, तत्त्वज्ञान, मानसिक आणि भावनिक क्रियाकलाप, आशा, सुख, आकांक्षा, परिपूर्ती, सभ्यता आणि संस्कृती ह्या साऱ्या साऱ्यांतून राष्ट्राचे ‘सूक्ष्म शरीर’ आकाराला येते. मातेच्या जीवनाचा हा भागही असा असतो, जो साध्या डोळ्यांनी देखील दिसतो.

राष्ट्राचा सूक्ष्म देह हा राष्ट्राच्या ‘कारण शरीरा’मध्ये जे खोलवर दडलेले अस्तित्व असते त्यामधून उदयाला येतो, युगानुयुगे घेतलेल्या अनुभवांमधून जी विशिष्ट अशी मानसिकता तयार झालेली असते, जी त्या राष्ट्राला इतरांपासून वैशिष्ट्यपूर्ण बनवते. ‘माते’चे हे तीन देह आहेत. परंतु त्या तिन्हीच्याही पलीकडे तिच्या जीवनाचा एक ‘उगमस्त्रोत’ आहे, जो अमर्त्य, अचल असा आहे; प्रत्येक राष्ट्र हे त्याचे केवळ आविष्करण असते, त्या वैश्विक ‘नारायणा’चे, ‘अनेकां’मध्ये वास करणाऱ्या ‘एका’चे ते आविष्करण असते, आपण सर्व जण त्याचीच बालकं आहोत.

– श्रीअरविंद
(CWSA 06-07 : 1115-1116)

श्रीअरविंद