विचार शलाका – १८
अतिमानसिक अवतरण शक्य होण्यासाठी, साधकाने त्याआधी बरीच पावले टाकली असली पाहिजेत. माणूस हा बरेचदा त्याच्या पृष्ठीय मन, प्राण आणि देहामध्येच जगत असतो पण त्याच्या आतमध्ये महत्तर शक्यता असणारे एक आंतरिक अस्तित्व असते, ज्याविषयी त्याने जागृत होणे गरजेचे असते. कारण सद्यपरिस्थितीत, मानवाला त्यातील अगदी मर्यादित प्रभावच प्राप्त होऊ शकतो. आणि तो प्रभावच त्याला एका महान सौंदर्याच्या, सुसंगतीच्या, शक्तीच्या आणि ज्ञानाच्या सातत्यपूर्ण अनुसरणासाठी प्रवृत्त करतो. म्हणून ह्या आंतरिक अस्तित्वाचे टप्पे खुले करणे आणि बाह्य जीवनात जगत असतानाही अंतरंगात राहणे, त्याचे बाह्य जीवन या आंतरिक प्रकाशाने आणि ऊर्जेने प्रशासित करणे ही योगाची पहिली प्रक्रिया होय. हे करीत असताना त्याला स्वत:मध्ये त्याच्या खऱ्या आत्म्याचा शोध लागतो, की जो मानसिक, प्राणिक आणि शारीरिक घटकांचे कोणतेही वरवरचे मिश्रण असत नाही पण त्यांच्यामागे असणाऱ्या वास्तविकतेचा (Reality) काही अंश असतो, त्या एकमेवाद्वितीय ‘दिव्य अग्नी’चा तो स्फुल्लिंग असतो. त्याने त्याच्या अंतरात्म्यात निवास करणे, शुद्धीकरण करणे आणि त्याची उर्वरित सर्व प्रकृती ही ‘सत्या’कडे असलेल्या त्याच्या प्रेरणेने अभिमुख करणे शिकायला हवे. त्याच्या पाठोपाठ उर्ध्वामुखी खुलेपण आणि ‘अस्तित्वा’च्या उच्चतर तत्त्वाचे अवतरण घडून येणे शक्य आहे. पण असे असले तरीसुद्धा ती एकदम संपूर्ण अतिमानसिक ‘प्रकाश’ किंवा ‘ऊर्जा’ असणार नाही. कारण सामान्य मानवी मन आणि अतिमानसिक ‘सत्य-चेतना’ यांच्या दरम्यान चेतनेच्या अनेक पातळ्या असतात. ह्या आंतरवर्ती पातळ्या खुल्या करून त्यांची शक्ती मन, प्राण आणि शरीरात उतरवणे आवश्यक असते. केवळ त्यानंतरच ‘सत्य-चेतने’ची पूर्ण शक्ती प्रकृतीमध्ये कार्य करू शकेल. म्हणून स्वयंशिस्तीची किंवा ‘साधने’ची ही प्रक्रिया प्रदीर्घ आणि अवघड आहे पण त्यातील थोडेच असले तरीदेखील खूप प्राप्त केल्यासारखे आहे कारण त्यामुळे अंतिम मुक्ती आणि पूर्णत्व हे अधिक शक्य होते.
– श्रीअरविंद
(CWSA 36 : 548-549)
- शून्यावस्था आणि अतिमानस - September 9, 2024
- ईश्वराचे दर्शन - September 8, 2024
- अतिमानसाची आवश्यकता - September 7, 2024