साधनेची मुळाक्षरे – २१

आध्यात्मिक गोष्टींचे आकलन करण्यासाठी मन अक्षम असते. आणि तरीसुद्धा, या पूर्णयोगाच्या मार्गावर प्रगत व्हायचे असेल तर, सर्व मानसिक मतमतांतरे आणि प्रतिक्रिया यांपासून स्वत:ला दूर राखणे, अगदी अनिवार्य असते.

सुखसोयी, समाधान, मौजमजा, आनंद यासाठीची सर्व धडपड सोडून द्या. केवळ प्रगतीचा एक धगधगता अग्नी बनून राहा. जे काही तुमच्यापाशी येईल ते तुमच्या प्रगतीसाठी साहाय्यकारी आहे असे समजून त्याचा स्वीकार करा आणि जी काही प्रगती करणे आवश्यक आहे, ती ताबडतोब करून मोकळे व्हा.

तुम्ही जे काही करता, त्यामध्ये आनंद घेण्याचा प्रयत्न करा; परंतु, आनंद मिळवायचा म्हणून कधीच काही करू नका.

कधीही उत्तेजित होऊ नका, उदास होऊ नका किंवा क्षुब्ध, अस्वस्थ होऊ नका. कोणत्याही परिस्थितीत पूर्णत: शांत राहून तिला सामोरे जा. आणि तरीदेखील आपण अजून काय प्रगती केली पाहिजे ह्याचा शोध घेण्यासाठी नेहमी सतर्क राहा आणि हे करण्यास विलंब करू नका.

वरवर दिसणाऱ्या भौतिक घटनांकडे पाहून त्यांचे अर्थ लावू नका कारण त्या घटना म्हणजे निराळेच काही अभिव्यक्त करण्याचा एक ओबडधोबड असा प्रयत्न असतो, खरी गोष्ट आपल्या वरवरच्या आकलनामधून निसटून जाते.

एखादी व्यक्ती तिच्या प्रकृतीमधील अमुक एका गोष्टीमुळे, तमुक एका प्रकारे वागत असते, तिच्या प्रकृतीमधील ती गोष्ट बदलवून टाकण्याचे सामर्थ्य तुमच्यामध्ये असल्याशिवाय, त्या व्यक्तीच्या वर्तणुकीविषयी कधीही तक्रार करू नका, आणि तुमच्याकडे जर तसे सामर्थ्य असेलच, तर तक्रार करण्याऐवजी ती गोष्ट बदलून टाका.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 33-34)

श्रीमाताजी