साधनेची मुळाक्षरे – २०

(श्रीमाताजी येथे भक्तिभावातून होणाऱ्या प्रगतीविषयी सांगत आहेत.)

भक्तीची भावना अंतःकरणात असेल तर अशा व्यक्तीला अडथळे, अडचणी यांच्या धक्क्यांची देखील तमा वाटत नाही. ते तुमचे काय वाईट करू शकणार? …व्यक्ती त्याची गणतीच करत नाही. इतकेच नव्हे, कधीकधी तर ती त्यावर हसतेसुद्धा. अधिक वेळ लागला तर त्याने तुम्हाला काय फरक पडणार आहे? अधिक वेळ लागला तर तेवढाच अधिक वेळ तुम्हाला अभीप्सेचा, आत्म-निवेदनाचा, आत्म-दानाचा आनंद मिळेल.

कारण तोच एकमेव खराखुरा आनंद असतो. आणि जेव्हा त्यामध्ये काहीतरी अहंभावात्मक आड येते तेव्हा तो आनंद मावळतो कारण तेथे एक प्रकारची मागणी असते – व्यक्ती त्याला गरज असे संबोधते – ती मागणी या आत्म-निवेदनात मिसळते. अन्यथा हा आनंद कधीच मावळत नसतो.

हा आनंद ही अशी गोष्ट असते की, जी व्यक्तीला सर्वप्रथम प्राप्त होते आणि सर्वात शेवटी उमगते. आणि हा आनंद हीच विजयाची खूण असते.

जोपर्यंत तुम्ही स्थिर, शांत, प्रकाशमान, अविचल अशा आनंदामध्ये सदासर्वकाळ नसता, तोवर तुम्हाला स्वतःचे शुद्धीकरण करण्यासाठी परिश्रम करावे लागणार, असा याचा अर्थ आहे, कधीकधी पुष्कळच परिश्रम करावे लागतात. पण ही त्याचीच खूण असते.

विभक्ततेच्या भावनेतूनच वेदना, दुःख, यातना, अज्ञान आणि सर्व प्रकारच्या अक्षमता येतात. निःशेष आत्म-दान, ‘स्व’ला विसरून केलेल्या आत्म-निवेदनानेच दुःखभोग नाहीसे होतात आणि त्यांची जागा असा आनंद घेतो की जो कशानेच झाकला जाऊ शकत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 396)

श्रीमाताजी