साधनेची मुळाक्षरे – १७
(श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्राचा हा अंशभाग…)
‘ईश्वर’ अस्तित्वात आहे आणि ‘ईश्वर’ हीच एक अशी गोष्ट आहे की, जिचे अनुसरण केले पाहिजे, तिच्या तुलनेत जीवनातील अन्य कोणतीच गोष्ट प्राप्त करून घेण्याजोगी नाही, ही जिवामध्ये उपजत असणारी श्रद्धाच, ‘योगमार्गा’मधील मूलभूत श्रद्धा आहे. ह्या चढत्यावाढत्या श्रद्धेमुळेच तुम्ही या ‘योगा’कडे वळला आहात आणि तुमच्यामधील ही श्रद्धा अजूनही मृत झालेली नाही किंवा मंदावलेली नाही. तुमच्या पत्रावरून असे दिसून येते की, ती अधिक आग्रही आणि स्थायी झाली आहे. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीमध्ये ती टिकून आहे तोपर्यंत ती व्यक्ती आध्यात्मिक जीवनासाठी निवडली गेली आहे, असे म्हणता येईल. मी तर असे म्हणेन की, त्याची प्रकृती ही कितीही अडथळ्यांनी भरलेली असली, अडीअडचणी आणि नकारांनी ठासून भरलेली असली आणि अगदी अनेक वर्षे संघर्ष करत राहावा लागलेला असला तरीसुद्धा, त्या व्यक्तीला आध्यात्मिक जीवनात यश मिळणार हे निश्चित.
…तर्क आणि सामान्य जाणीव यांच्याशी सुसंगत असणारी श्रद्धा तुम्ही विकसित करणे आवश्यक आहे – ती अशी की, जर ‘ईश्वर’ अस्तित्वात आहे आणि त्याने जर तुम्हाला या ‘मार्गा’ची हाक दिली आहे आणि ती आलेली आहे हे निश्चित, तर मग या सगळ्या पाठीमागे ईश्वरी मार्गदर्शन असेल आणि सर्व प्रकारच्या अडीअडचणींमधून पार होऊन सुद्धा, किंवा त्या अडीअडचणी असतानासुद्धा तुम्ही या मार्गावर येऊन पोहोचालच. अपयशाची आशंका व्यक्त करणाऱ्या विरोधी आवाजांकडे लक्ष देऊ नका किंवा त्यांना प्रतिसाद देणाऱ्या उतावळ्या, घाईगडबड करणाऱ्या प्राणिक आवाजांकडेदेखील लक्ष देऊ नका. मोठमोठ्या अडचणी आहेत आणि त्यामुळे यश मिळण्याची काही शक्यता नाही किंवा ‘ईश्वरा’ने आजवर स्वतःला कधीही प्रकट केले नाही, त्यामुळे तो पुढेही स्वतःला कधीच प्रकट करणार नाही, अशा म्हणण्यावर मुळीच विश्वास ठेवू नका. उलट, ज्यांनी ज्यांनी आपले मन हे एका अतिशय महान आणि अवघड ध्येयावर केंद्रित केलेले असते, अशा लोकांप्रमाणे तुम्हीसुद्धा अशी भूमिका घ्या की, “मला यश मिळेपर्यंत मी वाटचाल करतच राहीन आणि मग भले कितीही अडचणी येवोत, मी यशस्वी होईनच होईन.” यामध्ये ईश्वरनिष्ठ मनुष्य अजून एक भर घालतो, ती अशी की, ”ईश्वर अस्तित्वात आहे, तो आहेच आणि जर का तो अस्तित्वात आहेच तर, मग मी त्याचे जे अनुसरण करत आहे, त्यामध्ये कधीही अपयश येऊ शकणार नाही. मला जोवर तो गवसत नाही, तोवर कितीही दुःखसंकटे आली तरी, त्यांवर मात करून, मी वाटचाल करतच राहीन.”
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 93-94)
- विचारमुक्त होण्याचा मार्ग - February 12, 2025
- दोन प्रकारचे आकलन - February 11, 2025
- बुद्धीला आंतरिक प्रकाशाची आवश्यकता - February 10, 2025