साधनेची मुळाक्षरे – १३

तुमच्यामध्ये ‘श्रीमाताजीं’च्या शक्तीचे कार्य कोणत्याही नकाराविना किंवा अडथळ्याविना चालावे यासाठी श्रीमाताजींकडे वळलेले असणे म्हणजे उन्मुख असणे, खुले असणे. मन जर त्याच्या स्वतःच्या कल्पनांमध्येच बंदिस्त राहिले आणि जर का त्याने ‘प्रकाश’ आणि ‘सत्य’ आणण्यास श्रीमाताजींना नकार दिला; जर प्राण त्याच्या इच्छावासनांनाच चिकटून राहिला आणि श्रीमाताजींची शक्ती – जी खरी प्रेरणा आणि आवेग घेऊन येत असते – तिला प्राणाने प्रवेश करू दिला नाही; जर शरीर त्याच्या स्वतःच्या इच्छा, सवयी आणि जडत्वामध्येच बंदिस्त राहिले आणि त्यामध्ये ‘प्रकाश’ आणि ‘शक्ती’चा प्रवेश होऊ देण्यास आणि कार्य करू देण्यास शरीराने संमती दिली नाही, तर ती व्यक्ती उन्मुख असत नाही. एकाच वेळी सर्व गतिविधींमध्ये संपूर्णतया उन्मुखता आढळणे शक्य नाही, परंतु प्रत्येक भागामध्ये एक मध्यवर्ती उन्मुखता असली पाहिजे आणि केवळ श्रीमाताजींच्या कार्यालाच प्रवेश करू देईल अशी प्रभावशाली अभीप्सा किंवा संकल्पशक्ती असली पाहिजे, उरलेल्या साऱ्या गोष्टी क्रमशः होत राहतील.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 151)

श्रीअरविंद