साधनेची मुळाक्षरे – ०८

विश्वामध्ये जे जे काही केले जाते, त्या सर्व कृतींमागे ‘ईश्वर’च त्याच्या ‘शक्ति’द्वारा विद्यमान असतो पण तो त्याच्या ‘योगमाये’ने झाकला गेलेला असतो आणि कनिष्ठ प्रकृतीमध्ये तो जे कार्य करतो ते ‘जिवा’च्या अहंकाराद्वारा करत असतो.

‘योगा’मध्ये ‘ईश्वर’ हाच ‘साधक’ आणि ‘साधना’देखील असतो; त्याचीच ‘शक्ती’ स्वतःच्या प्रकाश, सामर्थ्य, ज्ञान, चेतना आणि ‘आनंद’ यांच्या साहाय्याने आधारावर (मन, प्राण, शरीर यांच्यावर) कार्य करते आणि जेव्हा आधार त्या शक्तिप्रत उन्मुख होतो, तेव्हा या सर्व दिव्य शक्ती त्या आधारामध्ये ओतल्या जातात आणि त्यामुळे ‘साधना’ शक्य होते. परंतु जोपर्यंत कनिष्ठ प्रकृती सक्रिय असते, तोपर्यंत ‘साधका’च्या व्यक्तिगत प्रयत्नांची आवश्यकता असतेच.

हा आवश्यक असलेला व्यक्तिगत प्रयत्न म्हणजे अभीप्सा, त्याग आणि समर्पण अशी त्रिविध तपस्या होय.

अभीप्सा जागरुक, निरंतर आणि अविरत असली पाहिजे – मनामध्ये तोच संकल्प, अंत:करणात तोच ध्यास, प्राणतत्त्वाची त्यालाच संमती, भौतिक-शारीरिक चेतना व प्रकृती ग्रहणक्षम आणि लवचीक करण्याची तीव्र इच्छा अशा स्वरूपाची अभीप्सा पाहिजे.

कनिष्ठ प्रकृतीच्या सर्व गतिवृत्तींना नकार – मनाच्या कल्पना, मते, आवडीनिवडी, सवयी आणि रचना यांना नकार, की ज्यामुळे निश्चल-नीरव मनामध्ये खऱ्या ज्ञानाला पूर्ण मोकळी जागा मिळेल, – प्राणिक प्रकृतीच्या वासना, मागण्या, लालसा, संवेदना, आवेग, स्वार्थीपणा, गर्व, उद्धटपणा, कामुकता, लोभ, मत्सर, हेवेदावे, ‘सत्या’शी वैर यांचा त्याग, की ज्यामुळे निश्चल, विशाल, समर्थ आणि समर्पित अशा प्राणमय अस्तित्वामध्ये वरून खरी शक्ती आणि आनंद यांचा वर्षाव होईल – भौतिक-शारीरिक प्रकृतीची मूढता, संशय, अविश्वास, दिङ्मूढता, दुराग्रह, क्षुद्रता, आळस, परिवर्तन-विमुखता, तामसिकता यांचा त्याग, की ज्यामुळे सतत अधिकाधिक दिव्य होत जाणाऱ्या देहात प्रकाश, शक्ती आणि ‘आनंद’ यांचे खरे स्थैर्य प्रस्थापित होईल.

‘ईश्वर’ आणि त्याची ‘शक्ती’ यांना आपण आपल्या स्वत:चे, आपण जे काही आहोत आणि आपल्याजवळ जे काही आहे त्या सर्वाचे, चेतनेच्या प्रत्येक स्तराचे आणि आपल्या प्रत्येक स्पंदनाचे समर्पण केले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 06)

श्रीअरविंद