साधनेची मुळाक्षरे – ०६
प्रश्न : पण ईश्वराला या गोंधळामध्ये, या पृथ्वीवर आविष्कृत व्हायची इच्छा का असते?
श्रीमाताजी : पृथ्वी म्हणजे त्या ईश्वराचेच विरूप (deformation) आहे आणि ‘तो’ त्याचे सत्य पुन्हा एकदा या पृथ्वीवर प्रस्थापित करू इच्छितो. त्याचसाठी त्याने ही पृथ्वी निर्माण केली आहे ; त्यामागे अन्य कोणताही हेतू नाही. पृथ्वी ही ‘त्याच्या’पासून विलग झालेली गोष्ट नाही किंवा ‘त्याला’ परकी नाही. पृथ्वी म्हणजे ‘ईश्वरा’चे विरूपीकरण आहे; ही पृथ्वी तिच्या साररूपात जशी होती तशीच, म्हणजे ‘ईश्वरस्वरूप’ बनण्याची पुन्हा एकदा आवश्यकता आहे.
प्रश्न : पण मग तो ‘ईश्वर’ आपल्यासाठी इतका अनोळखी का आहे?
श्रीमाताजी : बाळा, तो काही अनोळखी नाही. तो अनोळखी आहे, अशी तुम्ही कल्पना करता पण तो तसा नाही, तो अजिबात तसा नाही. तो तुमच्या अस्तित्वाचे सार आहे – तो काही अनोळखी नाही. तुम्ही ‘त्याला’ ओळखत नसलात तरीही तो अनोळखी नाही; तो तुमच्या अस्तित्वाचे अगदी मूळ सार-सर्वस्व आहे. ‘ईश्वरा’खेरीज तुम्ही अस्तित्वातच राहू शकणार नाही. ईश्वराखेरीज सेकंदाच्या एक दशलक्षाव्या भागाइतका काळदेखील तुम्ही जिवंत राहू शकणार नाही. याचे कारणच असे आहे की तुम्ही एक प्रकारच्या भ्रमामध्ये व विरूपामध्ये जगत असता, तुम्हाला त्याची जाणीव नसते. तुम्ही स्वतःच्या मूळ स्वरूपाविषयी सजग नसता, तर तुम्ही जे आहात, असे तुम्हाला वाटत असते, त्याच्याविषयीच फक्त तुम्हाला जाणीव असते; पण वस्तुतः तुम्ही ते नसता.
प्रश्न : माताजी, मग मी स्वतः कोण आहे?
श्रीमाताजी : ईश्वर!
– श्रीमाताजी
(CWM 07 : 191-192)
- रूपांतरणाची दीर्घकालीन प्रक्रिया – भाग ०५ - April 17, 2025
- रूपांतरणाची दीर्घकालीन प्रक्रिया – भाग ०४ - April 16, 2025
- रूपांतरणाची दीर्घकालीन प्रक्रिया – भाग ०३ - April 15, 2025