साधनेची मुळाक्षरे – ०५

आध्यात्मिक क्षेत्रातसुद्धा, अशी पुष्कळ माणसं आहेत (ज्यांनी आध्यात्मिक जीवन स्वीकारले आहे आणि जे योगसाधना करत आहेत त्यांच्यापैकी बहुतांशी लोक, असे मी म्हणेन.) की जी, म्हणजे त्यांच्यापैकी बरीच जणं ही वैयक्तिक कारणांसाठी सारे करत असतात, अनेक प्रकारची वैयक्तिक कारणं असतात : काही जण जीवनामुळे उद्विग्न झालेले असतात, काही दुःखी असतात, काही जणांना अधिक काही जाणून घेण्याची इच्छा असते, काहींना आध्यात्मिक दृष्ट्या कोणीतरी महान व्यक्ती बनायचे असते, इतरांना शिकविता यावे म्हणून काही जणांना काही गोष्टी शिकायच्या असतात; योगमार्ग स्वीकारण्याची खरोखरच हजारो वैयक्तिक कारणं असतात. पण एक साधीशी गोष्ट – ईश्वराप्रत स्वतःचे आत्मदान करावे, जेणेकरून ईश्वरच तुम्हाला हाती घेईल आणि त्याची जशी इच्छा आहे त्याप्रमाणे तो तुम्हाला घडवेल आणि ते सारे त्याच्या शुद्धतेनिशी आणि सातत्यानिशी घडवेल आणि हे खरोखरच सत्य आहे पण असे करणारे फार जण आढळत नाहीत; खरेतर या आत्मदानामुळेच व्यक्ती ध्येयाप्रत थेट जाऊन पोहोचते आणि मग तिच्याकडून कोणत्या चुका होण्याचेही धोके नसतात. पण त्यामध्ये नेहमीच इतर प्रेरणादेखील मिसळलेल्या असतात, अहंकाराने कलंकित झालेल्या असतात आणि स्वाभाविकपणेच त्या तुम्हाला कधी इकडे तर कधी तिकडे नेतात, कधीकधी तर त्या तुम्हाला ध्येयापासून खूप दूरही नेतात.

ईश्वराशी संपूर्ण, परिपूर्ण, समग्र आत्मनिवेदन हेच तुमच्या अस्तित्वाचे एकमेव कारण असले पाहिजे, एकमेव साध्य, एकमेव प्रेरणा असली पाहिजे; तुमच्यामध्ये आणि ईश्वरामध्ये कोणते वेगळेपणच जाणवणार नाही असे तुमचे आत्मनिवेदन असले पाहिजे; कोणत्याही वैयक्तिक प्रतिक्रियेची ढवळाढवळ न होता आपण स्वतःच पूर्णतः, संपूर्णतः, समग्रतेने तो ईश्वर व्हावे, अशी जर तुमची भावना असेल तर तो आदर्श दृष्टिकोन आहे. आणि शिवाय, तुम्हाला जीवनामध्ये आणि तुमच्या कार्यामध्येही पुढे घेऊन जाईल असा हाच एकमेव दृष्टिकोन आहे, तोच तुमचे सर्व गोष्टींपासून आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या स्वतः पासून (की जो सर्व धोक्यांमधील तुमच्यासाठी असलेला सर्वात मोठा धोका असतो.) रक्षण करेल; ‘स्वतः’ इतका इतर कोणताच धोका मोठा नसतो. (येथे ‘स्वतः’ हा शब्द ‘अहंकारयुक्त मी’ या अर्थाने घेतला आहे.)

– श्रीमाताजी
(CWM 07 : 190)