ईश्वरी कृपा – २८
व्यक्ती परिश्रम करण्यासाठी आणि तपस्येसाठी जर तयार नसेल, तसेच तिचे मनावर व प्राणावर जर नियंत्रण नसेल तर, अशी व्यक्ती मोठ्या आध्यात्मिक लाभाची अपेक्षा बाळगू शकणार नाही – कारण मन व प्राण स्वतःची सत्ता दीर्घकाळ टिकून राहावी म्हणून, तसेच त्यांना त्यांच्या आवडीनिवडी लादता याव्यात म्हणून विविध युक्त्याप्रयुक्त्या आणि निमित्तं शोधत राहणार; आणि आत्म्याची व चैतन्याची खुली माध्यमे आणि आज्ञाधारक साधने बनण्याची वेळ जेव्हा त्यांच्यावर येईल तेव्हा, तो दिवस दूर लोटण्यासाठी म्हणून मन व प्राण विविध युक्त्याप्रयुक्त्या आणि निमित्तं शोधत राहणार. ‘ईश्वरी कृपा’ कधीकधी गैरवाजवी किंवा वरकरणी गैरवाजवी परिणामदेखील घडवून आणते पण व्यक्ती हक्क म्हणून किंवा अधिकार म्हणून ‘ईश्वरी कृपे’ची मागणी करू शकत नाही, कारण जर तसे झाले तर मग ती ‘ईश्वरी कृपा’ असणार नाही. व्यक्तीने केवळ उच्चरवात हाक देण्याचा अवकाश की, लगेच त्याला प्रतिसाद मिळालाच पाहिजे, असा दावा व्यक्ती करू शकत नाही, हे तुम्ही पाहिले आहे. आणि तसेच माझ्या हेही पाहण्यात आले, ‘ईश्वरी कृपे’ने हस्तक्षेप करण्यापूर्वी नकळतपणे खरंच खूप दीर्घकाळ तयारी चाललेली असते, हे माझ्या नेहमीच लक्षात आले आहे; आणि तो हस्तक्षेप झाल्यानंतरही, जे काही प्राप्त झाले आहे ते सांभाळून ठेवण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी व्यक्तीला – इतर बाबींबाबत करावे लागते तसे याबाबतीतही – जोपर्यंत पूर्ण सिद्धी प्राप्त होत नाही तोपर्यंत, पुष्कळ काम करावे लागते. अर्थातच त्यानंतर परिश्रम संपुष्टात येतात आणि मग व्यक्तीला खात्रीशीरपणे ती गोष्ट प्राप्त झालेली असते. आणि त्यामुळे या ना त्या प्रकारची तपस्या ही आवश्यकच असते.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 173)
(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)
- शून्यावस्था आणि अतिमानस - September 9, 2024
- ईश्वराचे दर्शन - September 8, 2024
- अतिमानसाची आवश्यकता - September 7, 2024