ईश्वरी कृपा – २२

एके काळी माणसाची आध्यात्मिक अभीप्सा सगळ्या लौकिक गोष्टींपासून अलिप्त होत, जीवनापासून पलायन करत, नेमकेपणाने सांगायचे तर लढाई टाळत, संघर्षाच्या अतीत होत, साऱ्या प्रयत्नांपासून स्वतःची सुटका करून घेत, शांत, निष्क्रिय शांतिकडे वळलेली होती; या आध्यात्मिक शांतिमध्ये, संघर्ष, प्रयत्न, सर्व प्रकारच्या ताणतणावांची समाप्ती होत असेच; पण त्याबरोबरच सर्व त-हेच्या दुःखभोगांचीदेखील समाप्ती होत असे आणि यालाच आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाची खरी आणि एकमेव अभिव्यक्ती मानले जात असे. यालाच ईश्वरी कृपा, ईश्वरी साहाय्य आणि ईश्वरी मध्यस्थी असे मानले जात असे.

आणि अगदी आत्तादेखील, यातनामय, तणावपूर्ण, अतितणावपूर्ण अशा या काळामध्ये, या सार्वभौम शांतिचे सर्वांकडून सर्वोत्तम व सर्वाधिक स्वागत केले जाते. हे सांत्वन लोकांना हवे असते आणि ते त्याची आशा बाळगून असतात. अजूनदेखील अनेकांसाठी हे ईश्वरी मध्यस्थीचे, ईश्वरी कृपेचे खरे लक्षण आहे.

खरे तर, व्यक्ती कोणताही साक्षात्कार करून घेऊ इच्छित असली तरी, तिने हिच परिपूर्ण व अक्षय शांती प्रस्थापित करून सुरुवात केली पाहिजे; या शांतिच्या आधारावरच व्यक्तिने कर्म केले पाहिजे; व्यक्ती अनन्य, वैयक्तिक आणि अहंभावात्मक मुक्तिचे स्वप्न पाहत असेल तर गोष्ट वेगळी, अन्यथा व्यक्ती तेवढ्यावरच थांबू शकत नाही. ईश्वरी कृपेचा अजूनही एक वेगळा पैलू आहे, प्रगतिचा हा पैलू जो सर्व अडथळ्यांवर विजय मिळवेल, हा पैलू जो मानवाला एका नवीन साक्षात्काराच्या दिशेने प्रेरित करेल, हा पैलू जो एका नवीनच जगताची द्वारे खुली करेल आणि या दिव्य साक्षात्काराचा लाभ केवळ थोड्या निवडक लोकांसाठीच शक्य होईल असे नाही तर, त्यांच्या प्रभावामुळे, त्यांच्या उदाहरणाने, त्यांच्या शक्तिमुळे उर्वरित मानवजातिलादेखील नवीन आणि अधिक चांगली परिस्थिती प्राप्त होईल. त्यामुळे, ज्या मार्गांच्या शक्यता आधीच दिसलेल्या होत्या असे भविष्यकालीन साक्षात्काराप्रत जाणारे मार्ग खुले होतील. ज्या व्यक्तींनी जाणिवपूर्वकतेने किंवा अजाणतेपणाने या नवीन शक्तींप्रत स्वतःला खुले केले असेल, अशा मानवांची एक संपूर्ण फळीच अधिक उच्च, अधिक सुसंवादी, अधिक परिपूर्ण अशा जीवनामध्ये उन्नत केली जाईल.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 298)

श्रीमाताजी
Latest posts by श्रीमाताजी (see all)