ईश्वरी कृपा – ०३

“एखादी व्यक्ती जर या ‘ईश्वरी कृपे’शी ऐक्य पावली, तिला जर ईश्वरी कृपा सर्वत्र दिसू लागली तर, अशी व्यक्ती अत्यानंदाचे, सर्व-शक्तिमानतेचे, अपरिमित आनंदाचे, जीवन जगू लागेल. आणि असे जीवन जगणे हाच ईश्वरी कार्यातील सर्वोत्तम शक्य असा सहयोग ठरेल.”

(श्रीमाताजींचे वरील वचन त्यांनी स्वत: वाचून दाखविले आणि नंतर त्याचे स्पष्टीकरण केले. ते असे -)

यातील पहिली अवस्था प्रत्यक्षात उतरविणे हे तितकेसे सोपे नाही. जीवनात जाणिवपूर्वक विकास, नित्य निरीक्षण आणि सतत आलेले अनुभव यांचा तो परिणाम असतो.

मी हे तुम्हाला या आधीही अनेक वेळा सांगितले आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या विशिष्ट परिस्थितिमध्ये असता आणि काही विशिष्ट घटना घडतात, तेव्हा या घटना तुमच्या इच्छाआकांक्षांच्या किंवा तुम्हाला जे सर्वात चांगले आहे असे वाटत असते, त्याच्या बरेचदा विरोधात जाणाऱ्या असतात आणि मग बरेचदा तुम्हाला या साऱ्याचे वाईट वाटते आणि तुम्ही स्वतःच्याच मनाशी म्हणता, “जर ते तसे झाले असते तर किती बरे झाले असते, ते जर असे झाले असते तर किंवा ते जर तसे झाले असते तर…” अगदी लहानसहान आणि मोठ्या गोष्टींबाबतही असेच चाललेले असते. आणि मग वर्षांमागून वर्ष निघून जातात, घटना उलगडत जातात, तुमची प्रगती होत राहते, तुम्ही अधिक जागरूक होता, तुम्हाला गोष्टींचे आकलन अधिक चांगल्या रितीने होऊ लागते आणि मग जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा तुमच्या लक्षात येते – सुरुवातीला तुम्हाला अचंबा वाटतो आणि नंतर त्याकडे तुम्ही हसत हसत पाहता – तेव्हा जी परिस्थिती तुम्हाला अगदी अनर्थकारक किंवा प्रतिकूल वाटली होती आज तीच परिस्थिती तुमच्या प्रगतीसाठी सर्वोत्तम गोष्ट ठरलेली असते; तुमची प्रगती होण्यासाठी जे घडून येणे आवश्यक होते आणि शक्य होते तेच घडून आलेले असते. आणि तुम्ही थोडे जरी समजूतदार असाल तर तुम्ही स्वतःलाच सांगता, “खरोखर, ‘ईश्वरी कृपा’ अगाध आहे.”

तर यासारख्या गोष्टी जेव्हा तुमच्या आयुष्यात वारंवार घडतात तेव्हा तुम्हाला जाणवू लागते की, बाह्यरूपे फसवी असली आणि माणसाचा आंधळेपणा असला तरीदेखील, ‘ईश्वरी कृपा’ मात्र सर्वत्र कार्यरत असते, आणि त्यामुळे जग त्या क्षणाला ज्या अवस्थेत असते त्या परिस्थितिमध्ये जे सर्वोत्तम घडणे शक्य असते तेच त्या प्रत्येक क्षणी घडून येते. आपली दृष्टी मर्यादित असल्यामुळे किंबहुना, आपल्या पसंती-नापसंतीने आपण अंध झालेलो असल्याने, गोष्टी अशा अशा असतात, हे आपल्याला उमगत नाही.

व्यक्ती जेव्हा या गोष्टींकडे पाहू लागते तेव्हा ती एका अवर्णनीय अशा आश्चर्यकारक स्थितीमध्ये प्रवेश करते. कारण या बाह्य रूपांपाठीमागे असणाऱ्या अनंत, अद्भुत, सर्वशक्तिमान अशा ईश्वरी कृपेची तिला जाणीव होऊ लागते – ही ‘ईश्वरी कृपा’ सारे काही जाणते, ती साऱ्या गोष्टींचे संघटन करते, त्यांची व्यवस्था लावते आणि आपल्याला आवडो वा न आवडो, आपल्याला ती ज्ञात असो वा नसो, तरीसुद्धा ती आपल्याला परमश्रेष्ठ अशा ध्येयाकडे, ईश्वराशी ऐक्य या ध्येयाकडे, ईश्वराबद्दलची जाणीव आणि त्याच्याशी ऐक्य या ध्येयाकडे घेऊन जात असते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 255-256)

श्रीमाताजी