अडीअडचणीमध्ये, संकटामध्ये असताना व्यक्तीला देवाची आठवण होते, अशी व्यक्ती देवाचा धावा करते, त्या परिस्थितीमधून सोडवावे म्हणून त्याची प्रार्थना करते, ‘ईश्वरी कृपा’ व्हावी अशी तिला आस असते. आणि कधीकधी ‘ईश्वरी कृपा’ घडूनही येते. पण ती केव्हा झाली, कशी झाली, कृपा झाली म्हणजे नेमके काय झाले, व्यक्तीने अशा वेळी काय करायला हवे, तिचा दृष्टिकोन कसा असावा? किंवा कृपा व्हावी म्हणून काय करायला हवे, याची तिला जाण नसते. कृपा होणे म्हणजे स्वतःच्या मनाप्रमाणे सारे काही होणे अशी व्यक्तीची समजूत असते, त्यामध्ये कितपत तथ्य आहे, या साऱ्याचा मागोवा श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या विचारांच्या आधारे घेण्याचा आपण उद्यापासून प्रयत्न करणार आहोत.
तसेच एकंदर विश्वसंचालनामध्ये ‘ईश्वरी कृपे’चे कार्य कसे चालते, तेही आपण येथे समजावून घेणार आहोत. सामान्य जीवन ज्या कर्मसिद्धान्ताच्या नियमानुसार चालल्यासारखे दिसते, त्या सिद्धान्ताच्या वर ‘ईश्वरी कृपा’ असते, आणि तिच्यामध्ये गतकर्मांच्या बंधनांचा निरास करण्याची क्षमता असते, असे श्रीअरविंद आपल्याला सांगतात. श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या वचनांच्या आधारे, ‘ईश्वरी कृपा’ म्हणजे नेमके काय ते आपण समजावून घेऊ. उद्यापासून ‘ईश्वरी कृपा’ ही मालिका सुरु करत आहोत. धन्यवाद…
– संपादक, अभीप्सा मराठी मासिक
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – १६ - September 23, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – ०२ - September 9, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – ०१ प्रस्तावना - September 8, 2023