योग आणि मानवी नातेसंबंध – २२
एखादी व्यक्ती जोपर्यंत तुमच्या कल्पना आणि तुमच्या मतांशी सहमत होत नाही तसेच तिची कार्यपद्धती तुमच्या कार्यपद्धतीशी मेळ राखणारी नसते, तोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीशी सुसंवाद साधू शकत नाही, त्यातून सर्व त्रास निर्माण होतात.
तुम्ही तुमची चेतना अधिक विशाल केली पाहिजे आणि हे लक्षात घेतले पाहिजे की, प्रत्येक व्यक्तीचे तिचे तिचे स्वतःचे असे काही नियम असतात. सर्वांच्या इच्छा आणि कृती अगदी एकसारख्याच असल्या पाहिजेत, असा अट्टहास करता कामा नये; तर वैयक्तिक इच्छांच्या आनंददायी एकीकरणामधून, सुसंवाद आणि समजुतदारपणाचा आधार शोधणे आवश्यक असते.
*
आपला विरोधक कसा चुकीचा आहे आणि आपण कसे बरोबर आहोत, हे सिद्ध करण्यातील आपला उतावीळपणा हा प्रगतिशील सुसंवाद प्रस्थापित करण्यातील एक महत्त्वाचा अडथळा असतो.
*
मानसिक संकुचितपणा हा मनुष्यमात्रांमध्ये सर्वात जास्त फैलावलेला आजार आहे. त्यांच्या स्वतःच्या जाणिवेमध्ये जे आहे तेवढेच त्यांना समजू शकते आणि त्याखेरीज अन्य काहीही त्यांना सहन होत नाही.
*
जी व्यक्ती केवळ स्वतःचेच मत विचारात घेते ती अधिकाधिक संकुचित होत जाते.
*
प्रत्येकालाच समाधान देऊ शकेल असा प्रत्येक समस्येवर एक उपाय असतो; परंतु हा आदर्श उपाय शोधण्यासाठी, आपले स्वतःचेच अग्रक्रम इतरांवर लादण्याची इच्छा मनाशी बाळगून तसा प्रयत्न करता कामा नये तर, प्रत्येकालाच त्याची आवश्यकता वाटली पाहिजे.
यासाठी तुमची चेतना विशाल करा आणि सर्वांच्या समाधानाची आस बाळगा.
*
तुम्ही प्रश्नाकडे केवळ तुमच्याच बाजूने पाहता, पण तुम्हाला जर तुमची चेतना विशाल करायची असेल तर, सर्वच बाजूंकडे निःपक्षपातीपणे पाहणे कधीही चांगले. त्यानंतर तुम्हाला असे आढळून येईल की, या दृष्टिकोनाचे खूप फायदे आहेत.
– श्रीमाताजी
(CWM 14 : 266-268)
- रूपांतरणाची दीर्घकालीन प्रक्रिया – भाग ०५ - April 17, 2025
- रूपांतरणाची दीर्घकालीन प्रक्रिया – भाग ०४ - April 16, 2025
- रूपांतरणाची दीर्घकालीन प्रक्रिया – भाग ०३ - April 15, 2025