ईश्वराच्या समीपतेसाठी व्यक्तीमध्ये प्रेमाचा आणि सहानुभूतीचा अभाव असणे गरजेचे नाही; उलट, इतरांशी निकटतेची व एकत्वाची भावना असणे या गोष्टी म्हणजे, ईश्वरसान्निध्यामुळे आणि ईश्वराशी ऐक्यभावामुळे साधक ज्या दिव्य चेतनेमध्ये प्रवेश करतो, त्या दिव्य चेतनेचाच एक भाग असतात.

…तर दुसऱ्या बाजूने पाहता, मानवी समाज, मानवी मैत्री, प्रेम, स्नेह, सह-अनुभूती या गोष्टी, अगदी पूर्णतः किंवा सर्वच उदाहरणांबाबत असे नव्हे, पण मुख्यत्वेकरून आणि बऱ्याचदा प्राणिक (vital) आधारावर उभ्या असतात आणि त्यांच्या केंद्रस्थानी अहंकाराची पकड असते. आपल्यावर कोणीतरी प्रेम करत आहे याचे सुख, संपर्कामुळे अहंकार व्यापक होण्याचे सुख, आत्म्याचा परस्परांमध्ये प्रवेश, ज्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वांचे पोषण होते असा प्राणिक देवाणघेवाणीचा उल्हास, या साऱ्या गोष्टींवर माणसांचे सहसा प्रेम असते – आणि यामध्ये इतरही काही आणि याहूनही अधिक स्वार्थी अशा प्रेरणा असतात; त्या प्रेरणा वरील मूलभूत गतिविधींमध्ये मिसळतात. यामध्ये अर्थातच उच्चतर आध्यात्मिक, आंतरात्मिक, मानसिक आणि प्राणिक घटकही प्रवेश करतात किंवा प्रवेश करू शकतात; परंतु एकंदरच ही सर्व गोष्ट खूप गुंतागुंतीची असते, अगदी तिच्या सर्वोत्तम अवस्थेत देखील ती गुंतागुंतीचीच असते. आणि म्हणूनच एका विशिष्ट अवस्थेमध्ये कोणत्यातरी प्रत्यक्ष कारणामुळे किंवा कारणाविनादेखील हे जग, जीवन, मानवी समाज आणि नातेसंबंध तसेच परोपकार या गोष्टी नीरस वाटू लागतात. (इतर सर्व गोष्टींप्रमाणेच हा परोपकारदेखील अहं-प्रेरित असाच असतो.)

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 285-286)

श्रीअरविंद