दोन पुरुषांमध्ये किंवा दोन स्त्रियांमध्ये मैत्री होणे हे पुरुष आणि स्त्रीमध्ये मैत्री होण्यापेक्षा निश्चितपणे अधिक सोपे असते, कारण सहसा तेथे कोणतीही लैंगिक लुडबुड नसते. पुरुष आणि स्त्रीच्या मैत्रीला कोणत्याही क्षणी सूक्ष्मपणे किंवा थेटपणे लैंगिक वळण लागू शकते आणि त्यातून विकार निर्माण होण्याची शक्यता असते. परंतु स्त्री-पुरुषांच्या बाबतीत शुद्ध मैत्री अशक्यच असते असे मात्र नाही; अशी मैत्री असू शकते आणि ती नेहमीच अस्तित्वात असते. मात्र एवढे सांभाळले पाहिजे की, कनिष्ठ प्राणाने मागल्या दाराने त्यात डोकावून पाहता कामा नये किंवा त्याला प्रवेश देता कामा नये, या खुल्या किंवा छुप्या कनिष्ठ प्राणिक प्रकृतीच्या (लैंगिक) आधाराव्यतिरिक्त इतर गोष्टींवर आधारित अशी आत्मीयता किंवा एक प्रकारचे आकर्षण, एक प्रकारचा सुसंवाद हा पुरुष आणि स्त्रीच्या प्रकृतीमध्ये बरेचदा आढळून येतो. कधीकधी असा सुसंवाद प्राधान्याने मानसिक किंवा आंतरात्मिक किंवा उच्चतर प्राणाच्या पातळीवरील असू शकतो किंवा या साऱ्यांच्या मिश्रणामधूनही त्याला आधार लाभत असतो. अशी मैत्री ही स्वाभाविक असते आणि अशा वेळी इतर गोष्टी मिसळल्यामुळे ती निम्न स्तरावर उतरेल किंवा ती मैत्री मोडेल अशी शक्यता खूपच कमी असते.
– श्रीअरविंद
(CWSA 31 : 307)
- श्रीमाताजी आणि समीपता – ३३ - June 22, 2025
- श्रीमाताजी आणि समीपता – ३२ - June 21, 2025
- श्रीमाताजी आणि समीपता – ३१ - June 20, 2025