(श्रीमाताजींचे एक शिष्य ‘पवित्र’ पुढील वचन वाचून दाखवितात…)
“आपल्यामध्ये जे काही सर्वोत्तम आहे त्यानिशी जो आपल्यावर प्रेम करतो आणि आपण जसे आहोत, त्यापेक्षा काहीतरी निराळे असावे, अशी अधिकची अपेक्षा जो बाळगत नाही, तो आपला उत्तम मित्र.” (CWM 14 : 288)
श्रीमाताजी : आपण जी गोष्ट नेहमी विसरतो त्याच्या अनुषंगाने मी हे विधान केले होते. ती गोष्ट अशी की, व्यक्ती स्वतःचे मित्र आणि आजूबाजूला असणाऱ्यांकडून, ते जसे आहेत तसे नव्हे तर, तिला स्वतःला ते (मित्र) जसे असायला हवेत असे वाटते, तशी त्यांच्याकडून व्यक्ती अपेक्षा करत राहते – व्यक्ती स्वतःसाठी एक आदर्श ठरवू शकते आणि तोच आदर्श सर्वांवर लादू पाहते, पण…
यावरून मला टॉलस्टॉयच्या मुलाची गोष्ट आठवली. मी जपानमध्ये राहत असताना त्याची आणि माझी भेट झाली होती. जगातील माणसांमध्ये एकात्मता आणावी या आशेने तो जगभर प्रवास करत होता. त्याचा हेतू अतिशय उत्तम होता पण ते साध्य करण्याचा त्याचा मार्ग मात्र तितकासा चांगला नव्हता, असे दिसते. अत्यंत अविचल गांभीर्याने त्याने मला सांगितले की, जर प्रत्येकजण एकच भाषा बोलेल, प्रत्येक जण सारखेच कपडे परिधान करेल, एक सारखेच अन्नपदार्थ सेवन करेल आणि प्रत्येक जण समान रीतीनेच वागेल तर त्यामुळे अपरिहार्यपणे एकात्मता साधेल ! आणि जेव्हा त्याला विचारले की, हे तो कशा रीतीने साध्य करणार आहे, तेव्हा तो म्हणाला, ”देशोदेशी जाऊन एका नवीनच पण जागतिक भाषेची, एका नवीनच पण वैश्विक पोषाखाची आणि नवीनच पण वैश्विक सवयींची शिकवण दिली तर पुरेसे होईल.” तो हे अशा रीतीने करू इच्छित होता !
(श्रीमाताजी हसतात आणि म्हणतात,) खरे तर, प्रत्येक जण आपापल्या मर्यादित क्षेत्रात अशाच रीतीने वागत असतो. व्यक्तीचा स्वतःचा असा एक आदर्श असतो. सत्य, सुंदर आणि उदात्त कशाला म्हणावे, इतकेच काय पण ईश्वर म्हणजे काय, याचीदेखील प्रत्येकाची आपापली एक संकल्पना असते आणि ही संकल्पनाच तो इतरांवरही लादू इच्छित असतो. अशीही अनेक माणसं असतात की, ईश्वराबद्दलची त्यांची स्वतःची अशी एक संकल्पना असते आणि ते ती ईश्वरविषयक संकल्पना त्यांच्या सर्व शक्तिनिशी ईश्वरावरच लादू पाहत असतात आणि सहसा अशी माणसं स्वतःच्या जीवनाच्या अंतापर्यंत हिंमत हारत नाहीत !
आणि याच, अगदी स्वाभाविक आणि बहुतांशी अजाण अशा दृष्टिकोनाबद्दल बोलायचे माझ्या मनात होते; कारण मी जर तुमच्यापैकी एखाद्याला म्हणाले की, “हे बघा ! तुम्हीसुद्धा असेच करू इच्छित असता,” तर तो अगदी उसळून विरोध करेल आणि म्हणेल, “छे, छे! मी तरी माझ्या आयुष्यात असे कधीही केलेले नाही.” परंतु इतर लोकांबद्दल आणि विशेषतः त्यांच्या जीवनसरणीबद्दल एखाद्या व्यक्तीची जी मतं असतात ती याचसाठी असतात; कारण ते जसे असायला हवेत असे त्या व्यक्तीला वाटत असते, तशी ती माणसं असत नाहीत, वागत नाहीत म्हणून मग व्यक्ती त्यांना दोष देत राहते. या विश्वामध्ये दोन वस्तू अगदी एकसारख्या असू शकत नाहीत आणि असताही कामा नयेत; कारण तसे जर झाले तर ती दुसरी वस्तू निरूपयोगीच ठरेल कारण आधीपासून तशाच प्रकारची एक गोष्ट अस्तित्वात होती; तसेच हे विश्व अगणित बहुविधतेच्या सुमेळासाठी निर्माण झाले आहे आणि त्यामध्ये कोणत्याही दोन प्रक्रिया – इतकेच काय पण कोणत्याही दोन चेतना या कधीच एकसारख्या असत नाहीत, हे आपण कधीच विसरता कामा नये. आणि असे जर का आहे तर, आपण हस्तक्षेप करण्याचा आणि दुसऱ्या व्यक्तीलाही आपले विचार पटलेच पाहिजेत, अशी अपेक्षा बाळगण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? कारण जर तुम्ही अमुक एका पद्धतीने विचार करत असाल तर हे उघडच आहे की, दुसरी व्यक्ती अगदी तुमच्याच पद्धतीने विचार करू शकणार नाही. तसेच, व्यक्ती म्हणून तुमचा जो एक विशिष्ट प्रकार आहे, अगदी त्याच प्रकारची दुसरी व्यक्ती असू शकणार नाही, हे निश्चित. या विश्वामध्ये असणाऱ्या साऱ्या विभिन्न गोष्टींना एकत्रित करून, प्रत्येक वस्तुला तिच्या तिच्या योग्य स्थानी ठेवून, त्यांच्यामध्ये समन्वय घडवून, त्यांचा सुमेळ घडवायला तुम्ही शिकले पाहिजे. संपूर्ण सुसंवाद हा एकसारखेपणातून येत नाही तर, प्रत्येक गोष्ट तिच्या तिच्या योग्य जागी ठेवल्यानेच सुसंवाद निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे आपला खरा मित्र आपल्यासारखाच असला पाहिजे अशी अपेक्षा बाळगण्याचा आपल्याला अधिकार नाही, तो जसा आहे तसाच असावा; हे लक्षात घेऊन त्यावर आपली प्रतिक्रिया आधारलेली असली पाहिजे.
– श्रीमाताजी
(CWM 09 : 55-56)
- कर्म करताना कर्मरूप होणे – ०२ - September 30, 2024
- कर्म करताना कर्मरूप होणे – ०१ - September 29, 2024
- पूर्णयोगाचे ध्येय - September 6, 2024