प्रश्न : खरेखुरे प्रेम कसे करावे हे जाणून घ्यायचे असेल तर, प्रकृतीचे रूपांतरण होणे आवश्यक आहे का?
श्रीमाताजी : तुमच्या प्रेमाची गुणवत्ता ही तुमच्या चेतनेच्या रूपांतरणाच्या प्रमाणात असते.
प्रश्न : मला समजले नाही.
श्रीमाताजी : लहान मुलालादेखील समजेल इतके हे सोपे आहे. तुमची चेतना ही जर पशुवत असेल तर, तुम्ही प्राण्यांसारखेच प्रेम कराल. तुमची चेतना जर सामान्य माणसाची असेल तर तुम्ही सामान्य माणसासारखेच प्रेम कराल. तुमची चेतना ही जर अभिजनाची असेल तर तुमचे प्रेमदेखील उच्च व्यक्तीला साजेसेच असेल आणि तुमच्याकडे जर देवाची चेतना असेल तर तुमचे प्रेमदेखील देवासारखेच असेल. हे अगदी साधेसरळ आहे. आणि म्हणून, प्रगतीसाठी आणि आंतरिक रूपांतरणासाठी प्रयत्नपूर्वक, अभीप्सेच्या आणि विकासाच्या द्वारे, जर तुम्ही एका चेतनेमधून दुसऱ्या चेतनेमध्ये जाऊन पोहोचलात आणि तुमची चेतना जर अधिकाधिक विशाल होत गेली तर तुम्हाला येणारा प्रेमाचा अनुभव हा अधिकाधिक विशाल होत जाईल, हे अगदी उघड आहे.
समजा, तुम्ही अगदी स्फटिकवत स्वच्छ अशा खडकांमधून येणारे अगदी शुद्ध असे पाणी घेतलेत आणि ते एका बऱ्यापैकी मोठ्या भांड्यामध्ये साठवलेत आणि त्या भांड्यामध्ये मात्र तळाशी काहीसा किंवा पुष्कळसा किंवा अगदी मोठ्या प्रमाणात गाळ असेल; तर जे पाणी खडकांमधून आले होते, ते आता अगदी जसेच्या तसेच शुद्ध आहे असे तुम्ही म्हणू शकत नाही कारण त्यामध्ये त्या भांड्यामधील पुष्कळ गोष्टी मिसळल्या गेलेल्या असतात आणि त्यामुळे ते पाणी आता पूर्वीसारखे राहिलेले नसते. अशा प्रकारे, प्रेम हे गाभ्यामध्ये अतीव शुद्ध, स्फटिकवत आणि परिपूर्ण अशी गोष्ट असते. मानवी चेतनेमध्ये असताना त्या प्रेमात, बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात गाळ मिसळला जातो. त्या गाळाच्या प्रमाणात प्रेमदेखील अधिकाधिक गढूळ होत जाते.
– श्रीमाताजी
(CWM 06 : 102-103)
- संपूर्ण आणि समग्र ईश्वराधीनता - February 1, 2025
- भारत हाच जगातील असा एकमेव देश आहे… - January 26, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २३२ - January 24, 2025