मानवी प्रेम
मानवी प्रेम हे अर्थातच विश्वासपात्र नसते कारण ते स्वार्थाने आणि इच्छा-वासनांनी करकचून बांधले गेलेले असते. मानवी प्रेम म्हणजे कधीकधी धुकं आणि धुराने भरलेली अहंकाराची ज्वाला असते, तर कधी ती ज्वाला अधिक स्वच्छ आणि चमकदार रंगांची असते; कधीकधी ते सहज प्रवृत्ती आणि सवयी यांवर आधारलेले तामसिक प्रेम असते. कधीकधी हे प्रेम रजोगुणात्मक असते आणि प्राणिक देवाणघेवाणीसाठी आसुसलेले किंवा मग, आवेगांनी पोसलेले असते. कधी हे प्रेम अधिक सात्त्विक असते आणि ते स्वतःकडे निरपेक्षपणे पाहण्याचा किंवा निरपेक्ष बनण्याचा प्रयत्न करते. परंतु मूलतःच प्रेम हे वैयक्तिक गरजेवर किंवा आंतरिक वा बाह्य परतफेडीवर अवलंबून असते. आणि जेव्हा ही गरज भागवली जात नाही किंवा हे प्रतिफल दिले जात नाही किंवा ते मिळणे थांबते तेव्हा मग हे प्रेम बहुधा आटते किंवा संपुष्टात येते किंवा जर ते शिल्लक राहिलेच तर, ते केवळ भूतकाळातील सवयीचा एक उत्साहहीन किंवा कष्टमय अवशेष या स्वरूपात शिल्लक राहते, अन्यथा ते तृप्तीसाठी अन्यत्र वळते. जेवढे ते अधिक उत्कट असते तेवढे त्याला प्रकोप, संघर्ष, भांडणे, सर्व प्रकारचे अहंकारात्मक अडथळे, स्वार्थीपणा, अपकर्षण आणि अगदी संताप, तिरस्कार, बेबनाव यांचा देखील त्रास होण्याची शक्यता अधिक असते.
– श्रीअरविंद
(CWSA 31 : 296)
- साधना, योग आणि रूपांतरण – २५५ - February 17, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २५४ - February 16, 2025
- प्राणाचे रूपांतरण – प्रास्ताविक - February 14, 2025