…आपल्या कृतीला योग्य दिशा देण्यासाठी आणि आपल्या सहकाऱ्यांबाबत असलेल्या आपल्या चुकीच्या दृष्टिकोनाची कारणे शक्य तितक्या किमान पातळीवर आणण्यासाठी, आपल्या संपर्काची जी असंख्य कारणे असतात ती आपण नेहमीच अत्यंत काळजीपूर्वकपणे तपासली पाहिजेत आणि आपल्याला त्या सहकाऱ्यांशी संबद्ध करणाऱ्या आत्मीयतेचा प्रकार (शारीरिक, प्राणिक, अंतरात्मिक आणि मानसिक आत्मीयता) कोणता ते शोधून काढले पाहिजे.
अगदी काही थोड्याच व्यक्ती एकाच वेळी अस्तित्वाच्या चारही अंगांनी आपल्या निकट असतात. मित्र या शब्दाचा सखोल अर्थ ज्यांना लागू पडेल असे हे आपले मित्र असतात. त्यांच्यावर आपल्या कृतींचे सर्वाधिक परिपूर्ण, सर्वात जास्त पूर्णतया उपयुक्त आणि लाभदायक परिणाम होऊ शकतात.
दोन मानवी जीवनांमधील संबंध हे अस्तित्वाच्या अवस्थांच्या खोलीवर आणि त्यांच्या संख्येवर अवलंबून असतात; आणि त्यामध्ये, ही दोन जीवने संबंद्ध करणाऱ्या आत्मीयतांचा खेळ चालू असतो, हे आपण कधीही विसरता कामा नये.
सर्व वस्तुमात्रांमध्ये आणि आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या शाश्वत सारतत्त्वाशी जे तादात्म्य पावतात, तेच शाश्वतरीत्या एकत्र राहू शकतात.
…आपण जेव्हा आपल्या आंतरिक देवतेशी एकात्म पावतो तेव्हा आपण सर्वांशीच सखोलतेने एकात्म पावतो आणि आपण त्या देवतेच्या माध्यमातून, तिच्या साहाय्यानेच इतर जिवांच्या संपर्कात आले पाहिजे. तेव्हा मग, सर्व आकर्षण-प्रतिकर्षणापासून, सर्व पसंतीनापसंतीपासून मुक्त झालेले आपण, ‘तिचे’ (आंतरिक देवतेचे) जे निकटवर्ती आहेत त्यांच्याशी निकटवर्ती होतो आणि तिच्या पासून जे दूर आहेत त्यांच्यापासून दूर जातो.
– श्रीमाताजी
(CWM 02 : 73)
- कर्म करताना कर्मरूप होणे – ०२ - September 30, 2024
- कर्म करताना कर्मरूप होणे – ०१ - September 29, 2024
- पूर्णयोगाचे ध्येय - September 6, 2024