गेले काही दिवस आपण अमर्त्यत्व, शरीराचे रूपांतरण, अतिमानस यासंबंधीचे तत्त्वज्ञान समजावून घेतले. आपण पाहिले की, अतिमानसिक देहाच्या चार वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य म्हणजे दीप्तिमानता (luminosity). अशा देहाचे विवेचन करताना श्रीमाताजींनी म्हटले आहे की, ”अंततः तो देह दीप्तिमान होऊन जाईल, त्याच्या प्रत्येक पेशीमधून अतिमानसिक उज्ज्वलता प्रस्फुरित होत राहील. सूक्ष्म दृष्टी खुली होण्याइतपत ज्यांचा विकास झाला आहे केवळ अशा व्यक्तींनाच नव्हे; तर अगदी सामान्य माणसालादेखील ही प्रभा जाणवेल. अगदी हरएक व्यक्तीसाठी ती गोष्ट उघड सत्य असेल, अगदी शंकेखोर माणसाची सुद्धा ज्यामुळे खात्री पटेल असा तो रूपांतरणाचा स्थायी पुरावा असेल.”

तत्त्वज्ञान स्वरूपातील हे विधान, श्रीअरविंदांनी देह ठेवला तेव्हा मूर्त झालेले आपणास आढळते. ‘रूपांतरणाचा स्थायी पुरावा’ असे त्याचे वर्णन करता येईल. आयुष्यभर ज्या कारणार्थ देह झिजवला, किंबहुना देहधारणाच ज्या कारणार्थ घडली, ज्या कारणार्थ अवतार घेतला त्या अतिमानसिक प्रकाशाचे अवतरण स्वतःच्या देहामध्ये करून, तो देह श्रीअरविंदांनी या पृथ्वी-चेतनेच्या रूपांतरणासाठी विसर्जित केला.

“दिव्य चेतना प्राप्त करून घेणे आणि दिव्यत्वामध्ये जीवन जगणे म्हणजे स्वयमेव अमर्त्यत्व आणि शरीरसुद्धा दिव्य बनविणे आणि ते ईश्वरी कार्यासाठीचे व दिव्य जीवनासाठीचे सुयोग्य साधन बनविणे, ही त्याची (अमर्त्यत्वाची) भौतिक अभिव्यक्ती असेल” – असे श्रीअरविंदांचे सांगणे आहे. हे केवळ सांगणे नाही, हे केवळ पोकळ तत्त्वज्ञान नाही तर त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्रीअरविंद!

शंकेखोर मनाला याची खात्री कशी पटावी? श्रीअरविंदांनी दि.०५ डिसेंबर १९५० रोजी रात्री ०१ वाजून २६ मिनिटांनी देह ठेवला आणि नंतर दि. ०९ डिसेंबर १९५० रोजी सायंकाळी ०५ वाजता म्हणजे सुमारे शंभर तासांनी त्यांना समाधीस्थ करण्यात आले. या संपूर्ण कालावधीमध्ये त्यांच्या देहामध्ये विघटनाच्या कोणत्याही खाणाखुणा दिसत नव्हत्या, विघटनाचा लवलेशदेखील आढळून येत नव्हता.

“श्रीअरविंदांच्या देहामध्ये अतिमानसिक प्रकाशाचे संघनीकरण झालेले आहे, आणि म्हणून जोवर त्यामध्ये विघटनाची कोणतीही लक्षणे आढळत नाहीत तोवर तो देह तसाच ठेवण्यात येईल”, अशी घोषणा श्रीमाताजींनी केली होती.

पाँडिचेरी हा भारताचा पूर्व किनारा, उष्णकटिबंधीय प्रांत, आणि अशा प्रांतांमध्ये कोणत्याही बाह्य अथवा कृत्रिम उपायांचा अवलंब न करता, एखाद्याने देह ठेवल्यानंतर त्या देहाचे विघटन न होता तो टिकून राहणे, हेच शास्त्रज्ञांसाठी आणि डॉक्टरांसाठी देखील थक्क करणारे असे आश्चर्य होते. आणि त्याची नोंद त्यावेळच्या डॉक्टरांनी, प्रशासकांनी, वृत्तपत्रांनीसुद्धा घेतली होती. ‘प्रचंड भौतिकतावादाच्या या युगात आत्माच्या वर्चस्वाचे अविनाशी साक्षीदार’ अशा शब्दात सुविख्यात ‘हिंदु’ या वृत्तपत्राने या घटनेची नोंद घेतली होती. शंकेखोर व्यक्तींना, बुद्धिवाद्यांना मिळालेला हा एक भक्कम पुरावा होता.

देहाचे विघटन तर नाहीच, उलट शांतपणे ध्यानस्थ पहुडलेल्या देहाला व्यापून असणारा निळसर, सोनेरी दीप्तिमानतेचा अनुभव तेथील उपस्थितांना येत होता, त्याची वर्णने प्रत्यक्षदर्शींनी लिहून ठेवली आहेत. श्रीअरविंदांनी देह ठेवल्यानंतर आश्रमाच्या छायाचित्रकाराने काढलेले त्यांचे छायाचित्र आजही त्याची साक्ष देत आहे. (आजच्या post सोबत ते छायाचित्र दिले आहे आणि ते बघितल्यावर कोणालाही वाटावे की, जणूकाही श्रीअरविंद झोपलेले असताना कोणीतरी त्यांचे छायाचित्र घेतले आहे की काय?)

श्रीअरविंदानी देह ठेवण्यापूर्वी एक वर्ष आधी, अतिमानस अवतरणाच्या त्यांच्या जीवितकार्याबद्दल, श्रीमाताजी आणि त्यांची चर्चा झाली होती. तेव्हा या कार्यासाठी आवश्यकता भासल्यास आपले बलिदान देण्याची तयारी श्रीमाताजींनी दर्शविली होती, परंतु श्रीअरविंदांनी त्यांना सांगितले होते, “जर तशीच आवश्यकता भासली तर ते बलिदान मी करेन, तुम्ही अतिमानस अवतरणाचे आणि रूपांतरणाचे आपले कार्य चालू ठेवा.” आणि खरोखरच श्रीअरविंदांनी पुढे देह ठेवला आणि श्रीमाताजी त्यानंतर २३ वर्षे श्रीअरविंदप्रणित अतिमानस अवतरणाचे कार्य अखेरच्या श्वासापर्यंत करत राहिल्या. श्रीमाताजींचे प्राणोत्क्रमण हा देखील श्रीअरविंदांप्रमाणेच, मानवाच्या अमर्त्यत्वाच्या वाटचालीमधील महत्त्वपूर्ण टप्पा मानावा लागेल असाच आहे.

श्रीअरविंदांनी देह ठेवला ही वैश्विक परिस्थितीपुढे पत्करलेली शरणागती नव्हती किंवा मोक्षादी स्वार्थासाठी परलोकामध्ये निघून जाणेदेखील नव्हते, तर ते एक वीरमरण होते. पृथ्वीची जडभौतिक चेतना आणि अतिमानसिक चेतना यांमधील ते युद्ध होते. आज या पृथ्वीचेतनेमध्ये शरीर, प्राण आणि मन जसे स्थायी आहेत तशी अतिमानसिक चेतना या पृथ्वीचेतनेमध्ये स्थायी करायची तर त्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याचा निर्धार करून, प्राणपणाने दिलेली ती झुंज होती. पृथ्वी-चेतनेच्या उत्थानासाठी केलेला तो दिव्य त्याग होता.

या दिव्य त्यागाचे वर्णन करताना श्रीमाताजी म्हणतात, “ज्यांनी आमच्या साठी इतके काही केले, ज्यांनी कार्य केले, ज्यांनी संघर्ष केला, ज्यांनी दु:खभोग सहन केले, ज्यांनी आशा बाळगली, ज्यांनी खूप चिकाटी बाळगली; ज्यांनी सर्वासाठी संकल्प केला, सर्वासाठी प्रयत्न केले, आमच्यासाठी सारे काही तयार करून दिले, ज्यांनी आमच्यासाठी सारे काही प्राप्त करून घेतले; त्यांच्याप्रत आमची अनंत कृतज्ञता! त्यांच्यासमोर आम्ही नतमस्तक होत आहोत आणि अशी प्रार्थना करत आहोत की, आम्हाला त्यांचे कधीही विस्मरण होऊ नये; अगदी एक क्षणदेखील आपण हे विसरू नये की, आपण सारे त्यांचे ऋणी आहोत.” श्रीअरविंदांच्या समाधीवर कोरलेली ही वाक्यं आपल्याला त्यांच्या कार्याची सतत आठवण करून देत राहतात.

– संपादक, अभीप्सा मराठी मासिक

अभीप्सा मराठी मासिक