शारीरिक परिवर्तन

…तुमच्या शरीराची घडण कशी झाली? सर्व अवयव, सर्व कार्ये यांची घडण ही अगदी प्राण्यांच्या पद्धतीने झाली. तुम्ही पूर्णतः अवलंबून असता : तुमचे हृदय सेकंदाच्या हजाराव्या भागाइतका वेळ जरी बंद पडले तरी सगळे संपते, तुम्ही मरण पावता. सर्व गोष्टी चालू असतात आणि त्या आपोआप चालू असतात, तुमच्या जागृत इच्छेविना चालू असतात (आणि ते चांगलेच आहे, कारण जर तुम्हाला या साऱ्या कारभारावर देखरेख करावी लागली असती तर, तो सारा कारभार केव्हाच चुकीच्या दिशेने गेला असता.) तेव्हा सारे काही चालू असते. प्रत्येक गोष्ट आवश्यक असते कारण प्रत्येक गोष्ट त्याच पद्धतीने सुनियोजित करण्यात आली आहे. इंद्रियाशिवाय तुम्ही कार्य करू शकत नाही, निदान पूर्णतः तरी करू शकत नाही; त्याचे प्रतिनिधित्व करणारे असे तुमच्यामध्ये काहीतरी असावे लागते.

रूपांतरामध्ये हे अध्याहृत आहे की, या सगळ्या पूर्णत: शारीरिक व्यवस्थेची जागा ही ठरावीक प्रकारच्या विविध स्पंदनांनी युक्त अशा शक्तिसंचयाच्या व्यवस्थेने घेतली जाईल; प्रत्येक इंद्रिय-अवयवाची जागा, जागृत इच्छाशक्तिद्वारे संचालित होणाऱ्या आणि उच्चतर प्रांतामधून, वरून येणाऱ्या प्रक्रियेने जिला दिशा मिळत असते अशा एका जागृत शक्तिकेंद्राने घेतली जाईल. तेव्हा मग पोट, हृदय या गोष्टीच असणार नाहीत, रक्ताभिसरण नाही, फुफ्फुसे नाहीत… या साऱ्या गोष्टी नाहीशा होतील. हे सर्व इंद्रिय-अवयव ज्याचे प्रतीक असतात त्या गोष्टींचे प्रतिनिधित्व या स्पंदनांच्या पूर्ण संचाद्वारे केले जाईल आणि हे संच त्या अवयवांची जागा घेतील. कारण हे इंद्रिय-अवयव म्हणजे शक्तिकेंद्रांची केवळ भौतिक प्रतीके असतात; त्यांना मूलभूत अशी वास्तविकता नसते; तर या गोष्टी विशिष्ट परिस्थितीमध्ये त्या शक्तिकेंद्रांना एक विशिष्ट रूप किंवा एक आधार पुरवितात. तेव्हा मग हे रूपांतरित शरीर या खऱ्या शक्तिकेंद्रांमार्फत कार्य करू लागेल. त्यामुळे, प्राण्यांच्या शरीरामध्ये ज्याप्रमाणे इंद्रिय-अवयव हे शक्तिकेंद्रांची प्रतीके म्हणून विकसित झाले होते, त्या प्रतीकात्मक प्रतिनिधींच्या मार्फत कार्य करण्याची गरज रूपांतरित शरीराला आता उरणार नाही.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 58-59)

श्रीमाताजी