अमर्त्यत्व समजून घेताना

अमर्त्यत्व या शब्दाबद्दल काही गैरसमज आहेत आणि हे समज काही नवीन नाहीत; हे गैरसमज वारंवार होताना आढळतात. अमर्त्यत्वाविषयी जेव्हा कोणी बोलतो तेव्हा बहुतेक सगळ्यांना शरीराचे अस्तित्व अनंत काळ टिकून राहणार असे वाटते.

पहिली गोष्ट म्हणजे, शरीर अनंत काळपर्यंत तेव्हाच टिकून राहू शकते जेव्हा, त्याला त्याच्या अमर्त्य आत्म्याविषयी पूर्ण जाणीव होते आणि ते त्या आत्म्याशी एकत्व पावते, शरीर त्याच्याशी इतके तादात्म्य पावते की, शरीरालासुद्धा आत्म्यासमान क्षमता प्राप्त होते, सातत्यपूर्ण रूपांतरणाचे तसेच गुण प्राप्त होतात ज्यामुळे शरीरसुद्धा वैश्विक गतिविधीचे अनुसरण करण्याइतपत सक्षम होते. शरीर जर टिकून राहायचे असेल तर त्यासाठी ही अगदी पूर्णपणे अनिवार्य अशी गोष्ट आहे. कारण शरीर हे कठीण (rigid) असते, कारण ते गतिविधींचे अनुसरण करत नाही, वैश्विक उत्क्रांतीशी सातत्याने तादात्म्य पावण्यासाठी स्वतःमध्ये जे त्वरेने रूपांतरण घडवून आणले पाहिजे तसे ते करू शकत नाही, त्याचे विघटन होते आणि ते नष्ट होते. त्याचा अडेलतट्टूपणा, त्याचे काठिण्य, त्याची स्वतःचे रूपांतरण करण्याची अक्षमता या गोष्टींमुळेच त्याचा विनाश आवश्यक होऊन बसतो, त्यामुळे त्याचे मूलद्रव्य (substance) हे भौतिक मूलद्रव्यांच्या सर्वसाधारण प्रांतामध्ये परत जाऊन मिसळू शकते; ज्यामुळे त्या शरीराची पुन्हा नव्या रूपांमध्ये पुनर्घडण होऊ शकते आणि अशा प्रकारे ते पुढील प्रगती करायला सक्षम होते. पण सहसा, जेव्हा कोणी अमर्त्यत्वाविषयी बोलतो, तेव्हा माणसं शारीरिक अमर्त्यत्वाचाच विचार करतात – ते अजूनपर्यंत साध्य झालेले नाही, हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही.

शारीरिक अमर्त्यत्व शक्य आहे असे श्रीअरविंद सांगतात आणि ते असेही सांगतात की, असे अमर्त्यत्व घडून येईल; परंतु ते त्यासाठी एक अट घालतात, ती अशी की, त्यासाठी शरीराचे अतिमानसिकीकरण (supramentalised) झाले पाहिजे, त्याच्यामध्ये अतिमानसिक जिवाचे काही गुण तरी असले पाहिजेत, विकासानुगामित्व (plasticity) आणि सातत्यपूर्ण रूपांतर हे ते गुण आहेत.

– श्रीमाताजी
(CWM 10 : 28-29)

श्रीमाताजी