अमर्त्यत्वासंबंधी गीतेची शिकवण

मृत्यु अशी कोणती गोष्टच अस्तित्वात नाही, कारण, शरीर नष्ट होते पण शरीर म्हणजे काही मनुष्य नव्हे. जे अस्तित्वविहीन (nonexistent) आहे ते कधीही अस्तित्वात येऊ शकत नाही, तद्वतच जे वस्तुतः अस्तित्वात आहे, त्याचे अस्तित्व कधीही लोप पावू शकत नाही; ते ज्या माध्यमांतून प्रकट होते त्या माध्यमांची रूपे बदलू शकतात परंतु त्याचे अस्तित्व मात्र लोप पावू शकत नाही. आत्मा असतोच आणि तो कधीही नष्ट होऊ शकत नाही. अस्तित्वात असणे आणि नसणे यामधील विरोध, अस्तित्व (Being) आणि अस्तित्वात येणे (Becoming) यांच्यामधील समतोल हा मनाचा अस्तित्वविषयक दृष्टिकोन असतो; आणि या दृष्टिकोनाचा निरास तेव्हाच होतो जेव्हा आत्मा हाच एकमेव अविनाशी असून, त्याच्याद्वारेच या विश्वाचा विस्तार झाला आहे; हा साक्षात्कार मनाला होतो. समर्याद शरीरांना अंत असतो, परंतु त्याच्यावर ज्याची सत्ता असते, जो या शरीराचा वापर करतो तो (आत्मा) मात्र अनंत, अमर्याद, शाश्वत आणि अविनाशी असतो. मनुष्य ज्याप्रमाणे जीर्ण झालेली वस्त्रे टाकून नवीन वस्त्रे परिधान करतो त्याप्रमाणेच तोसुद्धा जुने शरीर त्यजून नवीन देह धारण करतो. आणि यामध्ये दुःख करण्यासारखे, खचून जाण्यासारखे किंवा कोमेजून जाण्यासारखे काय आहे ? हा (आत्मा) जन्माला येत नाही किंवा तो मरतही नाही; जी एकदाच अस्तित्वात येते आणि ती निघून गेली तर पुन्हा अस्तित्वातच येणार नाही, अशी काही ही गोष्ट नाही. ती गोष्ट अजन्मा, पुरातन आणि शाश्वत आहे; शरीराच्या हत्येने तिची हत्या होत नाही. अमर्त्य आत्म्याची हत्या कोण करू शकेल ? शस्त्रांनी त्याचा छेद करता येत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही किंवा पाणी त्याला बुडवू शकत नाही किंवा वारा त्याला सुकवू शकत नाही. शाश्वतपणे स्थिर, अविचल, सर्वव्यापी असणारा तो आत्मा सदैव, अगदी नेहमीच अस्तित्वात असतो. शरीराप्रमाणे तो व्यक्त होत नाही पण सर्व व्यक्ताहून तो अव्यक्त आत्मा श्रेष्ठ आहे. विचारांनी त्याचे विश्लेषण करता येत नाही तरीही समग्र मनापेक्षा तो महान असतो; जीवन, त्याची अंगे आणि जीवनाच्या विषयांप्रमाणे आत्म्यामध्ये परिवर्तन आणि फेरबदल होणे शक्य नसते; परंतु, तो मन, प्राण आणि शरीराच्या परिवर्तनापलीकडचा असूनही, हे सर्व जण जिचे आकलन करून घेण्यासाठी धडपड करत असतात अशी ती एक सद्वस्तु असते.

– श्रीअरविंद
(CWSA 19 : 62-63)

श्रीअरविंद