मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – १०

आता आपण सर्वात भयंकर अशा लढाईकडे वळतो; देहामध्ये लढले जाणारे हे शारीरिक युद्ध, कोणत्याही विश्रांतीविना किंवा कोणत्याही तहाविना सुरु असते. हे युद्ध जन्माबरोबरच सुरू होते आणि दोन प्रतिस्पर्ध्यांपैकी एकाच्या पराभवानेच ते संपुष्टात येणे शक्य असते. एकतर रूपांतरण-शक्तीचा (force of transformation) पराभव होतो किंवा विघटन-शक्तीचा (force of disintegration) पराभव होतो. जन्माबरोबरच या संघर्षाला सुरुवात होते असे मी म्हटले याचे कारण असे की, बऱ्याच काळानंतर जरी या दोन प्रक्रियांमधील संघर्षामध्ये जाणीवपूर्वकता आणि हेतुपूर्वकता येत असली तरी, खरे तर व्यक्ती जेव्हा या विश्वात प्रविष्ट होते अगदी त्या क्षणीच या दोन्ही प्रक्रियांमधील संघर्षाला सुरुवात झालेली असते. कारण ज्याप्रमाणे वाढ, सुसंवादी विकास, आक्रमणाचा प्रतिकार, आजारपणापासून सुटका होऊन परत सामान्य जीवन सुरळीत होणे, प्रत्येक प्रगमनशील सुधारणा, या गोष्टी रूपांतरकारी शक्तीच्या कार्याचे परिणाम असतात; अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक अस्वास्थ्य, प्रत्येक आजार, प्रत्येक विकृती, प्रत्येक अपघात हे विघटनकारी-शक्तीच्या कार्याचे परिणाम असतात. नंतर जेव्हा, चेतनेच्या विकासाबरोबर, ही लढाई हेतुपुरस्सर होते, तेव्हा त्याची परिणती या दोन विरोधी आणि प्रतिस्पर्धी प्रक्रियांमधील उन्मत्त स्पर्धेमध्ये होते; रूपांतरण की मृत्यू, या दोहोंपैकी आधी कोण आपले ध्येय गाठणार हे पाहण्याची एक शर्यतच सुरू होते. ही शर्यत म्हणजे निरंतर प्रयत्न, पुनरुज्जीवनकारी शक्तीला तिने खाली अवतरावे म्हणून तिच्यावर सातत्याने केलेले ध्यान आणि या शक्तीप्रत पेशींची ग्रहणशीलता वाढावी म्हणून केलेले प्रयत्न असतात. ही शर्यत म्हणजे, विध्वंस व अवनती यांच्या विनाशकारी शक्तीकार्याच्या विरोधात क्रमाक्रमाने दिलेली झुंज असते. ज्या ज्या कोणत्या गोष्टी आरोहणकारी उर्मीला प्रतिसाद देण्यास सक्षम असतील; ज्या प्रबोधनाला, शुद्धीकरणाला आणि स्थिरतेला प्रतिसाद देण्यासाठी सक्षम असतील अशा प्रत्येक गोष्टीभोवती असलेली या विनाशकारी शक्तींची पकड ढिली करण्यासाठी केलेले अथक प्रयत्न म्हणजे ही शर्यत असते. हा संघर्ष अंधकारमय आणि दुराग्रही असतो, बहुधा यामध्ये कोणतेही दृश्य परिणाम दिसून येत नाहीत किंवा जे आंशिक विजय प्राप्त केले गेले त्यांच्या कोणत्याही बाह्य खाणाखुणाही दिसून येत नाहीत आणि हे विजयदेखील नेहमीच अनिश्चित स्वरूपाचे असतात. – कारण जे कार्य झाले आहे ते पुन्हा करण्याची आवश्यकता आहे, असे नेहमीच वाटत राहते; पुढे टाकलेले प्रत्येक पाऊल हे, इतरत्र कोठेतरी माघार घ्यावी लागल्याची किंमत चुकती करूनच पुढे पडत असते. आणि आदल्या दिवशी जे काम केलेले असते ते दुसऱ्याच दिवशी पुन्हा पूर्वपदास आलेले असते. वस्तुतः, विजय तेव्हाच निश्चित आणि चिरस्थायी होऊ शकेल जेव्हा तो संपूर्ण विजय असेल. या साऱ्याला वेळ लागतो, खूप काळ लागतो, वर्षेच्या वर्षे निष्कारणपणे लोटतात, आणि त्यामुळे प्रतिकूल शक्तींची ताकद मात्र वाढते.

एखाद्या खंदकाजवळ जसा पहारेकरी उभा असावा तशी चेतना सदासर्वकाळ उभी असते; भीतीचा लवलेश नको किंवा दक्षतेमध्येही कसर नको अशा पद्धतीने, तुम्ही मात्र दृढ राहिलेच पाहिजे, कोणतीही किंमत द्यावी लागली तरीही तुम्ही दृढ राहिले पाहिजे, जे जीवितकार्य पूर्ण करायचे आहे त्यावर अविचल श्रद्धा ठेवत आणि ऊर्ध्वस्थित असणाऱ्या, तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या आणि तुम्हाला टिकवून ठेवणाऱ्या शक्तीच्या साहाय्यावर तुम्ही अविचल श्रद्धा ठेवली पाहिजे. कारण जो अतीव तितिक्षा (endurance) बाळगतो, त्याचाच शेवटी विजय होतो.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 86-87)

श्रीमाताजी