‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ३४

(पूर्णयोगामध्ये कोणतीही एकच एक पद्धत अवलंबण्यात येत नाही. प्रत्येकाची त्याच्या त्याच्या प्रकृतीशी मिळतीजुळती अशी स्वतंत्र पद्धत असते, हे या योगाचे एक प्रकारे वेगळेपण आहे. पूर्णयोगाचे हे वैशिष्ट्य श्रीअरविंद यांच्या खालील पत्रांमधून अधोरेखित होते.)

योगाचे किंबहुना विश्व-बदलविणाऱ्या आणि प्रकृतीमध्ये परिवर्तन घडविणाऱ्या योगाचे परिपूर्ण तंत्र कोणते? एखादा हुक किंवा गळ टाकून माणसाला पकडले आणि एखाद्या पुलीद्वारे निर्वाणामध्ये किंवा स्वर्गामध्ये वर ओढून घेतले अशा प्रकारचे काही हे तंत्र नाही. विश्व-परिवर्तन करणाऱ्या योगाचे तंत्र हे, विश्वाप्रमाणेच विविधरूपी, वळणावळणाचे, सहनशील, सर्वसमावेशक असणे आवश्यक आहे. जर त्या तंत्राला सर्व अडीअडचणी किंवा शक्यता हाताळता आल्या नाहीत किंवा त्या तंत्राला, प्रत्येक आवश्यक घटकाला काळजीपूर्वकपणे हाताळता आले नाही तर, त्याला यश मिळण्याची शक्यता असेल का? आणि प्रत्येकालाच समजू शकेल अशा प्रकारचे एखादे परिपूर्ण तंत्र असे करू शकेल काय? (काव्यशास्त्रामधील) एखाद्या ठरावीक वृत्तामध्ये, थोडेफार फेरफार करून, एखादी छोटीशी कविता लिहिण्यासारखे हे नाही. तुम्ही जर ही कवितेची उपमा तशीच पुढे चालवली तर, विश्व-परिवर्तनाचे तंत्र म्हणजे महाभारताचेच महाभारत लिहिण्यासारखे आहे.

*

या योगामध्ये आत्म-निवेदनाचे आणि आत्म-दानाचे सार्वत्रिक तत्त्व सर्वांसाठी समानच आहे पण प्रत्येकाचा आत्मनिवेदनाचा आणि आत्म-दानाचा स्वतःचा असा एक मार्ग असतो. ‘क्ष’ चा मार्ग हा ‘क्ष’ साठी चांगला आहे, तसाच तुम्ही निवडलेला मार्ग हा तुमच्यासाठी चांगला आहे, कारण तो तुमच्या प्रकृतीशी मिळताजुळता आहे. अशा प्रकारची लवचीकता आणि विविधता योगामध्ये नसती आणि सर्वांना एकाच साच्यामध्ये बसवावे लागले असते तर योग म्हणजे एक कठोर मानसिक यंत्रसामग्रीच ठरला असता, तो एक जिवंत शक्ती बनला नसता.

*

योगमार्ग ही एक जिवंत गोष्ट असली पाहिजे, तो एखादा मानसिक सिद्धान्त नाही किंवा आवश्यक सर्व विभिन्नतांच्या विरोधात जिला चिकटून राहावी अशी, योग म्हणजे कोणतीही एकच एक अशी पद्धती नव्हे.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 294), (CWSA 29 : 103), (SABCL 24 : 1463)

श्रीअरविंद