‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ३२
व्यक्तीने स्वतःमध्ये असलेले सर्वकाही ईश्वराला निवेदित करणे, व्यक्ती स्वतः जे आहे ते आणि तिच्यापाशी जे जे काही आहे ते ते सर्व ईश्वराला अर्पण करणे; स्वतःच्या कल्पना, इच्छा, सवयी इत्यादी यांचा आग्रह न धरणे, उलट त्यांची जागा सर्वत्र, ईश्वरी ‘सत्या’ला त्याच्या ज्ञानाद्वारे, त्याच्या संकल्पाद्वारे आणि त्याच्या कार्याद्वारे घेऊ देणे म्हणजे समर्पण.
*
ईश्वराप्रत स्वत:ला सोपवून देणे म्हणजे समर्पण. व्यक्ती जे काही आहे आणि तिच्यापाशी जे जे काही आहे ते ते सारे ‘ईश्वरा’ला देऊ करणे; आपले स्वत:चे असे काहीही नाही, असा दृष्टिकोन बाळगणे; अन्य कोणत्याही नव्हे, तर केवळ ‘ईश्वरी’ इच्छेच्या आज्ञेचे पालन करणे; अहंकारासाठी नव्हे तर, ‘ईश्वरा’साठी जीवन व्यतीत करणे म्हणजे समर्पण.
*
समर्पण हे परिपूर्तीचे साधन असते हेच आपल्या साधनेचे पहिले तत्त्व आहे आणि जोपर्यंत अहंकार किंवा प्राणिक मागण्या आणि इच्छावासना यांना खतपाणी घातले जाते तोपर्यंत संपूर्ण समर्पण अशक्य असते. आणि तोवर आत्मदानदेखील अपूर्ण असते. आम्ही ही गोष्ट कधीच लपविलेली नाही. समर्पण अवघड असू शकते, ते तसे असतेही परंतु तेच तर साधनेचे खरे तत्त्व आहे. समर्पण अवघड असल्यामुळेच, कार्य पूर्ती होईपर्यंत ते स्थिरपणे आणि धीराने केले पाहिजे.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 67 & 75-76)
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – २२ - September 29, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – २१ - September 28, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – २० - September 27, 2023