‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ३१
नकार
(श्रीअरविंदांनी साधकांना लिहिलेल्या पत्रांमधून…)
मी ज्या योग्य स्पंदनांविषयी म्हाणालो ती स्पंदने एकतर अंतरात्म्याकडून किंवा वर असणाऱ्या आध्यात्मिक प्रांतामधून आलेली असतात अथवा अंतरात्म्याच्या किंवा आध्यात्मिक प्रभावाने मनामध्ये किंवा प्राणामध्ये (vital) आकाराला येतात. एखादी व्यक्ती प्रामाणिकपणे अभीप्सा बाळगेल आणि जे त्याज्य आहे त्यास शक्य असेल तितका नकार देईल, तर तेव्हा आंतरात्मिक आणि आध्यात्मिक प्रभाव अधिकाधिक कार्य करेल, अधिकाधिक खरा सद्सदविवेक आणेल, योग्य स्पंदनांची निर्मिती करेल, त्यांना प्रोत्साहन देईल, त्यांना आधार देईल आणि चुकीची स्पंदने शोधून, त्यांना हतोत्साहित करेल आणि ती वगळेल. श्रीमाताजी आणि मी हीच पद्धत सर्वांना सांगत असतो.
*
इच्छांचा विलय म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे, हे मला समजले नाही. इच्छांना व्यक्तित्वातून बाहेर काढून टाकणे, नकार देणे, हे या योगाचे एक तत्त्व आहे. जी गोष्ट मनामधून नाकारण्यात येते ती बरेचदा प्राणामध्ये जाते, प्राणाने नाकारलेली गोष्ट ही शारीरिक स्तरावर जाऊन पोहोचते आणि शरीराने नाकारलेली गोष्ट ही अवचेतनामध्ये (subconscient) जाते, हे खरे आहे. अवचेतनातून हद्दपार केलेली गोष्ट ही तरीही वातावरणातील चेतनेमध्ये रेंगाळत राहण्याची शक्यता असते – तेथे तिचा व्यक्तीवर कोणताही ताबा नसतो आणि त्यामुळे ती समूळ काढून टाकणे शक्य असते.
*
प्रत्येक गोष्ट बाहेरून, म्हणजे वैश्विक प्रकृतीमधून येत असते, हे सर्वज्ञात वास्तव आहे. परंतु येणारी प्रत्येक गोष्ट स्वीकारलीच पाहिजे असे कोणतेही बंधन व्यक्तीवर असत नाही, व्यक्ती ती गोष्ट स्वीकारू शकते किंवा नाकारू शकते. भूतकाळामध्ये स्वीकाराची एक चिवट सवय जडलेली असेल तर, एकदम नकार द्यायला जमेल असे नाही, पण जर नकार देण्यामध्ये स्थिरपणे सातत्य राखले तर सरतेशेवटी व्यक्ती त्यात यशस्वी होईल. तुम्ही काय केले पाहिजे तर, कनिष्ठ अनुभवांना नकार दिला पाहिजे आणि आपले लक्ष एकमेव आवश्यक गोष्टीवर, म्हणजे… ‘प्रकाश’, ‘स्थिरता’, ‘शांती’, ‘भक्ती’ यांवर केंद्रित केले पाहिजे, त्याबाबत स्थिर अभीप्सा बाळगली पाहिजे. तुम्ही कनिष्ठ प्राणिक अनुभवांमध्ये रुची घेता आणि त्यांचे निरीक्षण करत राहता, त्यांच्याविषयी विचार करत राहता म्हणून त्या गोष्टी तुमचा ताबा घेतात आणि त्यामुळेच ईश्वराशी असलेला ‘संपर्क’ सुटतो आणि गोंधळ निर्माण होतो. तुम्ही या आधीही अशा प्रकारचे बरेच अनुभव घेतलेले आहेत आणि आता जेव्हा ते येतील तेव्हा त्यांना दृढपणे नकार देण्यासाठी तुम्ही तुमच्या मनाची तयारी केली पाहिजे.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 64-65)
- अतिमानसिक साक्षात्कार - September 10, 2024
- शून्यावस्था आणि अतिमानस - September 9, 2024
- ईश्वराचे दर्शन - September 8, 2024