‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २४
योगामध्ये सुरुवाती सुरुवातीला तुम्हाला बरेचदा ईश्वराचे विस्मरण होण्याचा संभव असतो. परंतु सातत्यपूर्ण अभीप्सेने तुम्ही तुमचे स्मरण वाढविता आणि विस्मरण नाहीसे करून टाकता. पण एक कठोर शिस्त किंवा कर्तव्य या भावनेने ही गोष्ट घडता कामा नये तर ती प्रेम आणि आनंदाची (एक सहज) क्रिया असली पाहिजे. आणि मग लवकरच अशी एक अवस्था येईल की, तुम्हाला एका क्षणासाठी जरी ईश्वराचे अस्तित्व जाणवले नाही, तर मग तुम्ही काहीही करत असलात तरी तुम्हाला एकदम एकाकी, उदास, दुःखीकष्टी वाटायला लागते.
ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव झाल्याशिवाय तुम्ही एखादी गोष्ट करू शकत असाल आणि तरीही तुम्ही अगदी सुखी आहात असे जर का तुम्हाला आढळले तर, तुमच्या अस्तित्वातील ते अंग ईश्वराला समर्पित झालेले नाही, हे तुम्ही जाणले पाहिजे. ज्यांना ईश्वराच्या अस्तित्वाची कोणतीच निकड भासत नाही अशा सामान्य मानवतेचा हा मार्ग झाला. परंतु दिव्य जीवनाच्या साधकाच्या बाबतीत मात्र ही गोष्ट काहीशी निराळी असते. जेव्हा तुमचे ईश्वराशी संपूर्णतया एकत्व झालेले असते तेव्हा, ईश्वर तुमच्यापासून क्षणभर जरी दूर झाला, तर तुम्ही अगदी मृतवत होता. कारण तो ईश्वरच आता तुमच्या जीवनाचे जीवन असतो, तोच तुमचे समग्र अस्तित्व असतो, तोच तुमचा एकमेव आणि संपूर्ण आधार असतो. जर ईश्वर नसेल तर मग काही शिल्लकच उरत नाही.
– श्रीमाताजी
(CWM 03 : 26-27)
- कर्म करताना कर्मरूप होणे – ०२ - September 30, 2024
- कर्म करताना कर्मरूप होणे – ०१ - September 29, 2024
- पूर्णयोगाचे ध्येय - September 6, 2024