‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २१
योगाच्या ध्येयाप्रत पोहोचणे नेहमीच कठीण असते, पण या योगात ते इतर कोणत्याही योगापेक्षा अधिक कठीण आहे आणि ज्यांना या योगाची हाक आलेली आहे, ज्यांची कोणत्याही गोष्टीला तोंड देण्याची आणि कोणताही धोका पत्करण्याची, अगदी अपयशाचा धोका पत्करण्याचीही तयारी आणि क्षमता आहे, तसेच संपूर्ण नि:स्वार्थीपणा, वासनाशून्यता आणि समर्पण यांच्या दिशेने प्रगती करण्याचा ज्यांचा संकल्प आहे, त्यांच्यासाठीच हा योग आहे.
*
या (पूर्ण)योगामध्ये फक्त ईश्वराचा साक्षात्कार अपेक्षित नाही तर, संपूर्ण आत्मनिवेदन (consecration) अभिप्रेत आहे, तसेच दिव्य चेतनेच्या आविष्करणासाठी जोपर्यंत जीवन सक्षम होत नाही आणि ते ईश्वरी कार्याचा एक भाग बनत नाही तोपर्यंत, आंतर व बाह्य जीवनात बदल घडवीत राहणे, हे या योगामध्ये अभिप्रेत आहे. म्हणजेच, निव्वळ नैतिक आणि शारीरिक तपश्चर्येपेक्षा कितीतरी अधिक काटेकोर व अवघड अशी आंतरिक शिस्त येथे अभिप्रेत आहे. इतर अनेक योगांपेक्षा खूप विशाल व अधिक कठीण असलेल्या अशा या योगमार्गामध्ये, एखाद्याने त्याला अंतरात्म्याकडून हाक आल्याची खात्री असल्याखेरीज आणि काहीही झाले तरी अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्याची तयारी असल्याखेरीज प्रवेश करता कामा नये.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 27)
- आध्यात्मिकतेचा गाभा - November 28, 2023
- धार्मिकता, चमत्कार आणि आध्यात्मिकता - November 27, 2023
- मानवतेची सेवा आणि आध्यात्मिकता - November 26, 2023