‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २०

माझा ‘योग’ हा त्याच्या सर्व सिद्धान्तांसहित अगदी पूर्णतः नवीन आहे, असे मी कधीही म्हटलेले नाही. मी याला ‘पूर्णयोग’ असे नाव दिले आहे. आणि या शब्दांचा अर्थ असा की, यामध्ये अनेक योगांची तत्त्व व प्रक्रिया समाविष्ट केल्या आहेत. त्याचे नावीन्य त्याच्या ध्येयात, उद्दिष्टात आणि पद्धतीतील समग्रतेत आहे.

…काही साधकांना लिहिलेल्या पत्रात मी हा योग नवीन आहे, यावर भर दिला आहे. कारण, माझ्या दृष्टीने, जुन्याच योगांची संकल्पना व त्यांच्या ध्येयांची पुनरावृत्ती पुरेशी नाही, आजवर जी गोष्ट साध्य झाली नव्हती, जी गोष्ट आजवर सुस्पष्टपणे दिसलेली नव्हती अशी एक गोष्ट प्राप्तव्य म्हणून मी समोर मांडत होतो. ही गोष्ट अगदी स्वाभाविक असली तरीदेखील, आजवरच्या साऱ्या भूतकालीन आध्यात्मिक प्रयासांचे नियोजित गंतव्य म्हणून अजूनपर्यंत तरी ती गुप्तच होती.

प्राचीन योगांच्या तुलनेत हा योग पुढील बाबतीत नावीन्यपूर्ण आहे.
१) जगापासून किंवा जीवनापासून निवृत्त होऊन स्वर्ग, निर्वाण यांच्याकडे प्रयाण हे या योगाचे उद्दिष्ट नाही. उलट , हा योग जीवनामध्ये आणि अस्तित्वामध्ये परिवर्तनाचे उद्दिष्ट बाळगतो. ते गौण आणि अनुषंगिक उद्दिष्ट आहे, असे तो मानत नाही तर ते वैशिष्ट्यपूर्ण आणि केंद्रवर्ती उद्दिष्ट आहे असे तो मानतो. अन्य योगांमध्ये ‘अवतरण’ (descent) असलेच तर, आरोहणाच्या (ascent) मार्गावरील केवळ एक घटना म्हणून किंवा आरोहणाचा परिणाम म्हणून ते घडून आलेले असते, अन्य योगांमध्ये आरोहण हीच सत्य गोष्ट असते. या योगात आरोहण हे अनिवार्य आहे; परंतु त्याचा परिणाम म्हणून घडून येणारे ‘अवतरण’ हीच गोष्ट येथे निर्णायक असते आणि तीच येथे आरोहणाचे अंतिम उद्दिष्ट मानण्यात आलेले आहे. आरोहणाच्या द्वारे नवीन चेतनेचे अवतरण घडून येणे, ही या साधनेनी उमटवलेली मोहोर आहे. तंत्रयोग आणि वैष्णव या संप्रदायांची परिसमाप्तीसुद्धा जीवनापासून सुटका यामध्ये होते; तर ‘जीवनाची दिव्य परिपूर्ती’ हे या पूर्णयोगाचे उद्दिष्ट आहे.

(२) व्यक्तीने केवळ स्वतःसाठी, स्वतःपुरता ईश्वराचा साक्षात्कार करून व्यक्तिगत सिद्धी प्राप्त करून घ्यावी हे येथे उद्दिष्ट नाही. व्यक्तीने केवळ पारलौकिक उपलब्धीच नव्हे तर येथील पृथ्वीचेतनेसाठी, वैश्विक अशी काही प्राप्ती करून घ्यावी हेही येथे अपेक्षित आहे. आजवर या पृथ्वी-चेतनेमध्ये, अगदी आध्यात्मिक जीवनामध्येसुद्धा सक्रिय नसलेली किंवा सुसंघटित नसलेली अतिमानसिक (the supramental) चेतनेची शक्ती आणणे आणि ती शक्ती सुसंघटित करणे आणि ती थेटपणे सक्रिय होईल हे पाहणे, ही गोष्टसुद्धा साध्य करून घ्यायची आहे.

(३) चेतनेचे आणि प्रकृतीचे समग्र व संपूर्ण परिवर्तन हे या योगाचे उद्दिष्ट आहे, ते जेवढे समग्र आणि संपूर्ण आहे तेवढीच त्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी पूर्वनिश्चित करण्यात आलेली साधनापद्धतीदेखील तितकीच समग्र आणि संपूर्ण आहे; या योगामध्ये जुन्या पद्धतींचा स्वीकार केवळ एक आंशिक क्रिया म्हणूनच केला जातो आणि त्या साधनापद्धती त्याहूनही वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या साधनापद्धतींपर्यंत नेण्यात येतात.

ही पद्धती पूर्णतः किंवा तिच्यासारखे काही, पूर्वीच्या योगांमध्ये समग्रतया प्रस्तावित केले आहे किंवा अशी काही पद्धती पूर्वीच्या योगांमध्ये अंमलात आणली आहे असे, मला आढळले नाही. जर मला तशी पद्धती आढळली असती तर, मी हा मार्ग निर्माण करण्यामध्ये माझा वेळ व्यर्थ खर्च केला नसता; जर हा मार्ग अगोदरच अस्तित्वात असता, निर्धारित करण्यात आलेला असता, अगोदरच त्याचा आराखडा पूर्णतः काढलेला असता, तो चांगला गुळगुळीत करण्यात आलेला असता, सुरक्षित आणि सर्वांसाठी खुला करण्यात आलेला असता तर मी सुखाने मार्गस्थ होऊन, माझ्या उद्दिष्ट-धामापर्यंत सुरक्षितपणे, त्वरेने पोहोचलो असतो, या शोधामध्ये आणि आंतरिक निर्मितीमध्ये मला तीस वर्षे खर्च करावी लागली नसती.

जुन्याच मार्गावरून पुन्हा एकवार वाटचाल हे आमच्या योगाचे स्वरूप नाही तर, आमचा योग म्हणजे एक ‘आध्यात्मिक साहस’ आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 399-401)

श्रीअरविंद