‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०९

(महत्त्वाकांक्षा आणि अप्रामाणिकपणा या धोक्यांचा विचार आपण काल केला, आता आणखी एक धोका विचारात घेऊ.)

आणखी एक धोका असतो. तो धोका लैंगिक आवेगांबाबत असतो. शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये योग तुम्हाला अगदी उघडावागडा करतो आणि तुमच्यामध्ये सुप्त असलेले सारे आवेग आणि इच्छावासना बाहेर काढतो. कोणत्याही गोष्टी लपवायच्या नाहीत किंवा तशाच बाजूला सोडून द्यायच्या नाहीत हे तुम्ही शिकायला हवे. तुम्ही त्यांना सामोरे गेले पाहिजे आणि जिंकले पाहिजे आणि त्यांची पुनर्घडण केली पाहिजे.

योगाचा पहिला परिणाम असा होतो की, मानसिक नियंत्रण सुटते आणि सुप्तपणे पडून असलेल्या साऱ्या वासना अचानकपणे मोकाट सुटतात आणि त्या वर उफाळून येतात आणि व्यक्तीच्या संपूर्ण अस्तित्वावर त्या आक्रमण करतात. जोपर्यंत मानसिक नियंत्रणाची जागा ईश्वरी नियंत्रणाने घेतली जात नाही तोपर्यंत एक संक्रमणकाळ असतो की, जेव्हा तुमची प्रामाणिकता आणि तुमचे समर्पण यांचा कस लागतो. लोक लैंगिक आवेगासारख्या आवेगांची खूप जास्त प्रमाणात दखल घेतात आणि सहसा त्यामुळेच या आवेगांना बळ मिळते. लोक त्या आवेगांचा खूप जोरदार प्रतिकार करतात आणि जबरदस्तीने त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करतात, त्यांना दाबून ठेवतात. पण तुम्ही एखाद्या गोष्टीचा जेवढा जास्त विचार कराल आणि म्हणाल, ”मला ही गोष्ट नको आहे, मला ही गोष्ट नको आहे,” तेवढ्या अधिक प्रमाणात तुम्ही त्याने बांधले जाता. तुम्ही काय केले पाहिजे ? तर ती गोष्ट शक्यतो तुमच्यापासून दूर ठेवा, तुमचा त्या गोष्टीशी असलेला संबंध तोडा, तिची शक्य तेवढी कमीत कमी दखल घ्या आणि जरी तुमच्या मनात त्या गोष्टीचा विचार आलाच तरीही नि:संग राहा आणि त्यांच्याबाबत निश्चिंत राहा.

योगाच्या दबावामुळे जे आवेग आणि इच्छावासना पृष्ठभागावर येतील, त्या जणू काही तुम्हाला परक्या आहेत किंवा त्या बाह्य जगाशी संबंधित आहेत असे समजून, अनासक्त वृत्तीने आणि शांत चित्ताने त्यांना सामोरे जा. त्या ईश्वरार्पण केल्या पाहिजेत म्हणजे मग ईश्वर त्यांना आपल्या हाती घेईल आणि त्यांच्यात रूपांतर घडवून आणेल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 05)

श्रीमाताजी