पूर्णयोगाची योगसूत्रे – ०३

प्रश्न : योग करण्याची पात्रता येण्यासाठी आम्ही काय केले पाहिजे?

श्रीमाताजी : प्रथमतः आपण जागृत व्हायला हवे. आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या अगदीच अल्प अंशाची जाणीव असते. उरलेल्या अधिकांश भागाविषयी आपण अजागरूक असतो. आणि या अजागरूकतेमुळेच आपण आपल्या असंस्कारित प्रकृतीला चिकटून राहतो आणि ती अजागरूकताच प्रकृतीमध्ये काही बदल किंवा रूपांतरण घडवून आणण्यास प्रतिबंध करते. या अजागरूकतेच्या माध्यमातूनच अदिव्य शक्ती आपल्यामध्ये प्रवेश करतात आणि आपल्याला त्यांचे गुलाम बनवून टाकतात. तुम्ही स्वत:विषयी जागृत झाले पाहिजे, तुमची प्रकृती व तुमच्यामध्ये निर्माण होणारी आंदोलने यांविषयी तुम्ही जागृत झाले पाहिजे. तुम्ही काही गोष्टी का करता व कशा करता, त्याविषयी तुमच्या भावना कशा प्रकारच्या आहेत व त्या तशा का आहेत, त्या गोष्टीसंबंधी तुमचे विचार काय आहेत व ते तसे का आहेत याचे तुम्ही ज्ञान करून घेतले पाहिजे. जे हेतू व ज्या उर्मी, ज्या प्रकट वा अप्रकट शक्ती तुम्हाला कृतिप्रवण करतात त्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. सारांश असा की, तुम्ही तुमच्या अस्तित्वरूपी यंत्राचे भाग सुटे सुटे करून निरखून पारखून पाहिले पाहिजेत. अशा रितीने एकदा का तुम्ही जागृत झालात की, तुम्हाला वस्तुस्थिती ओळखता येईल, तिचे पृथक्करण करता येईल. तुम्हाला खाली खेचणाऱ्या शक्ती कोणत्या व तुम्हाला साह्यभूत होणाऱ्या शक्ती कोणत्या, हे तुम्हाला ओळखता येईल. योग्य काय नि अयोग्य काय, सत्य काय नि असत्य काय, दिव्य काय नि अदिव्य काय हे एकदा का तुम्हाला समजू लागले की तुमच्या त्या ज्ञानानुसारच तुम्ही अगदी काटेकोरपणे आचरण केले पाहिजे. म्हणजेच जे योग्य व दिव्य त्याचा निश्चयपूर्वक स्वीकार करून, त्याच्या विरोधी असणाऱ्या सर्वांचा त्याग केला पाहिजे. पदोपदी हे द्वंद्व तुमच्यापुढे उभे राहील आणि पदोपदी तुम्हाला निवड करावी लागेल. तुम्हाला धीर धरावा लागेल, चिकाटीने व सावधगिरीने प्रयत्न करावा लागेल; संतसत्पुरुष सांगतात त्याप्रमाणे, ‘निद्रारहित’ राहावे लागेल. दिव्यत्वाच्या विरोधी असणाऱ्या अदिव्याला कोणतीच संधी मिळू नये यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी अदिव्याला नकार दिला पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 02)

श्रीमाताजी