समर्पण – ५१

स्वतः काही केल्याशिवाय श्रीमाताजींकडे (कशाचीही) मागणी न करणे; तर आनंद आणि शांती अवतरतात तेव्हा त्यांचा प्रभाव आणि त्यांचे मार्गदर्शन पूर्ण मनोभावे स्वीकारणे; कोणतेही प्रश्न उपस्थित न करता, दोष शोधत न बसता तो आनंद आणि ती शांती स्वीकारणे आणि त्यांची आपल्यामध्ये वृद्धी होऊ देणे; ‘शक्ती’ कार्यरत झाल्याचा अनुभव येतो तेव्हा कोणताही विरोध न करता, त्या शक्तीला कार्य करू देणे; ज्ञान प्रदान केले जाते तेव्हा ते स्वीकारणे आणि त्याचे अनुसरण करणे; ‘ईश्वरी इच्छा’ प्रकट केली जाते तेव्हा स्वतःला त्या इच्छेचे साधन बनवणे; हा समर्पणाचा गाभा आहे. ‘ईश्वर’ नेतृत्व करू शकतो, पण तो व्यक्तीला चालवत नाही. प्रत्येक मनोमय जीवाला म्हणजे ज्याला ‘मनुष्य’ असे संबोधले जाते अशा प्रत्येक व्यक्तीला एक आंतरिक स्वातंत्र्य असते; आपले नेतृत्व करण्याची अनुमती त्या ‘ईश्वरी नेतृत्वा’ला द्यायची की द्यायची नाही, हे ठरविण्याचे आंतरिक स्वातंत्र्य व्यक्तीला असते. तसे नसेल तर खरी आध्यात्मिक उत्क्रांती कशी काय शक्य होईल?

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 67-68)

श्रीअरविंद