समर्पण – ४९

…(आपल्या व्यक्तित्वामध्ये असे काही घटक असतात, ) त्यांना ईश्वराप्रत संपूर्ण समर्पण करण्याची इच्छा असते, त्या ईश्वराची ‘इच्छा’ आणि त्याचे ‘मार्गदर्शन’ यांच्याप्रत स्वतःचे आत्मदान करण्याची त्यांची इच्छा असते; आणि त्याच वेळी, म्हणजे जेव्हा तसा अनुभव येतो – जेव्हा व्यक्ती अगदी प्रामाणिकपणे ईश्वराप्रत आत्मदान करू पाहते तेव्हा, या मार्गावर येणारा हा समान अनुभव आहे, – व्यक्तीला असे वाटू लागते की, मी कोणीच नाही, मी काहीच करू शकत नाही, ‘ईश्वरा’व्यतिरिक्त मला स्वतंत्र अस्तित्वच नाही म्हणजे, जर ‘ईश्वर’ नसेल तर मी जिवंतच राहू शकणार नाही, काहीच करू शकणार नाही, मी म्हणजे कोणीच नसेन… हा अनुभव, अर्थातच, संपूर्ण आत्मदानाच्या मार्गावरील एक साहाय्यकारी अनुभव म्हणून येतो; परंतु जेव्हा हा असा अनुभव येतो तेव्हा, आपल्याच अस्तित्वामध्ये असलेला एखादा घटक भयंकर बंड करून उठतो आणि म्हणतो, “मला मात्र माफ करा! मला जिवंत राहायचे आहे, मला काहीतरी बनायचेच आहे, मला स्वतःला म्हणून काही गोष्टी करायच्याच आहेत, मला माझे स्वतःचे व्यक्तिमत्त्व हवे आहे.” आणि अर्थातच, या दुसऱ्या घटकाच्या अशा वृत्तीमुळे पहिल्या घटकाने केलेले समर्पण मातीमोल ठरते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 284)

श्रीमाताजी