समर्पण – ४७

‘विश्वात्मक’ ईश्वराप्रत असो की ‘विश्वातीत’ ईश्वराप्रत असो, आत्मसमर्पण करण्यातील खरा अडथळा कोणता असेल तर तो म्हणजे व्यक्तीला स्वतःच्या मर्यादांविषयी वाटणारे प्रेम हा होय. हे प्रेम स्वाभाविक असते, कारण अगदी मूळ घडणीपासूनच व्यक्तिपर अस्तित्वामध्ये मर्यादांवर लक्ष केंद्रित करण्याची प्रवृत्ती आढळून येते. अन्यथा, पृथगात्मतेची (separateness) जाणीवच असणार नाही – सारे काही एकमेकांमध्ये मिसळल्यासारखे होईल, चेतनेच्या मानसिक आणि प्राणिक गतिविधींमध्ये बरेचदा तसे घडताना दिसते. मन आणि प्राण यांच्याइतके शरीर प्रवाही नसल्यामुळे विशेषतः ते मात्र व्यक्तीचे स्वतंत्र व्यक्तित्व राखून ठेवते. पण एकदा का ही पृथगात्मता प्रस्थापित झाली की, मग ती गमावण्याची भीतीसुद्धा तेथे हळूच प्रवेश करते – वास्तविक, अनेक बाबतीत पृथगात्मतेची प्रेरणा हितकर असते, परंतु ईश्वराच्या संदर्भात मात्र ती चुकीच्या रीतीने अंमलात आणली जाते. कारण वास्तविक, ईश्वरामध्ये तुम्ही तुमचे व्यक्तित्व गमावत नसता; तर तुम्ही फक्त तुमचा अहंकार सोडून देत असता आणि खरीखुरी व्यक्ती बनत असता; एक दिव्य व्यक्तिमत्त्व बनत असता. ज्या शारीर चेतनेला सहसा तुम्ही तुमचा ‘स्व’ असे समजता, त्या शारीर चेतनेच्या घडणीप्रमाणे हे व्यक्तिमत्त्व अस्थायी नसते. दिव्य चेतनेचा एक स्पर्श जरी तुम्हाला झाला तर तुम्हाला तत्क्षणी असे जाणवेल की, त्यामध्ये तुम्ही काहीही गमावलेले नाही. उलटपक्षी, शरीराला शंभर वेळा मरण जरी आले तरी टिकून राहणारी, आणि प्राणिक व मानसिक उत्क्रांतीच्या सर्व स्थित्यंतरातून टिकून राहणारी अशी खरी व्यक्तिपर चिरस्थायिता तुम्हाला प्राप्त होते.

*

या किंवा त्या अशा कोणत्याही अडचणीला तोंड द्यावे न लागता, एखाद्या व्यक्तीला ‘ईश्वरी इच्छे’प्रत पूर्णतया समर्पण करता येणे, ही फारच दुर्मिळ गोष्ट आहे. एकदा का व्यक्तित्वाची घडण झाली की, आपले आत्मदान करण्यासाठी, समर्पणासाठी व्यक्तीला पुन्हा पुन्हा कितीतरी प्रयत्न करावे लागतात, संघर्ष करावा लागतो.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 169), (CWM 14 : 113)

श्रीमाताजी