समर्पण – ४४
साधनेमध्ये तुम्हाला प्रगती करण्याची इच्छा असेल तर तुम्ही ज्या शरणागतीविषयी आणि समर्पणाविषयी बोलत आहात ते समर्पण प्रामाणिक, खरेखुरे आणि समग्र असले पाहिजे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या इच्छांची तुमच्या आध्यात्मिक अभीप्सेमध्ये सरमिसळ करत राहाल तोपर्यंत हे होणे शक्य नाही. जोपर्यंत तुम्ही कुटुंब, मुलंबाळं किंवा कोणत्यातरी वस्तुशी किंवा कोणाही व्यक्तीबाबतची प्राणिक आसक्ती पोसत राहाल तोपर्यंत प्रामाणिक, खरेखुरे, समग्र समर्पण शक्य नाही. तुम्हाला योगसाधना करायची असेल तर आध्यात्मिक सत्य ग्रहण करणे आणि तुमच्या विचारांद्वारे, भावनांद्वारे, कृतींद्वारे आणि तुमच्या प्रकृतीद्वारे त्या सत्याचे आविष्करण करणे ही तुमची एकच एक इच्छा आणि अभीप्सा असली पाहिजे. तुम्ही कोणाही बरोबरच्या कोणत्याही नातेसंबंधांबद्दल आसक्ती बाळगता कामा नये. साधकाचे इतरांबरोबर असलेले नातेसंबंध हे साधकासाठी अंतरंगातून आलेले असले पाहिजेत, जेव्हा साधकाला खरी चेतना गवसलेली असेल आणि जेव्हा तो साधक प्रकाशात राहत असेल तेव्हा हे नाते निर्माण झाले पाहिजे. असे नातेसंबंध हे अतिमानसिक सत्यानुसार, दिव्य जीवनासाठी आणि दिव्य कार्यासाठी, दिव्य मातेच्या शक्तीने आणि इच्छेने त्या साधकाच्या अंतरंगामधूनच निर्धारित केलेले असतील. हे नातेसंबंध त्याच्या मनाने आणि त्याच्या प्राणिक इच्छांनी निर्धारित केलेले असता कामा नयेत.
…तुमचा चैत्य पुरुष हा श्रीमाताजींना आत्मदान करण्याच्या, तसेच सत्यामध्ये जीवन जगण्याच्या आणि सत्यामध्येच वृद्धिंगत होण्याच्या क्षमतेचा आहे; परंतु तुमचे कनिष्ठ प्राणिक अस्तित्व हे आसक्ती, संस्कार आणि इच्छांच्या अशुद्ध स्पंदनांनी पूर्ण व्यापलेले आहे आणि तुमचे बाह्यवर्ती शारीरिक मन हे त्याच्या अज्ञानमूलक कल्पना, सवयी सोडून देऊ शकत नाहीये, आणि सत्याप्रत खुले होऊ शकत नाहीये. …जर तुम्हाला ते खरोखर हवे असेल, म्हणजेच केवळ तुमच्या चैत्य पुरुषाला नव्हे तर ते तुमच्या शारीर-मनाला आणि तुमच्या संपूर्ण प्राणिक प्रकृतीलादेखील हवे असेल तर उपरोक्त अज्ञानमूलक कल्पना, सवयी इ. सर्व गोष्टींपासून केवळ श्रीमाताजीच तुम्हाला मुक्त करू शकतील.
– श्रीअरविंद
(CWSA 32 : 141-142)
- अतिमानसिक साक्षात्कार - September 10, 2024
- शून्यावस्था आणि अतिमानस - September 9, 2024
- ईश्वराचे दर्शन - September 8, 2024