समर्पण – १९

ज्या क्षणी तुम्ही स्वतःला असे विचारू लागता की, “ईश्वराला अर्पण या विचाराने मी ही कृती केली का? ईश्वराला अर्पण करत आहोत अशी माझी भावना होती का?” त्या क्षणापासून जीवनातील प्रत्येक बारकावा आणि प्रत्येक कृती, विचारांचे प्रत्येक स्पंदन, अगदी प्रत्येक संवेदना, भावना जिला एरवी फार महत्त्व दिले गेले नसते ती गोष्ट आता निराळीच बनून जाते. जर तुम्ही तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी याचे स्मरण ठेवू शकाल तर, तुमचा दृष्टिकोन आधी होता त्यापेक्षा पूर्णपणे बदलून जातो. तो अधिक व्यापक होतो. असंख्य छोट्या छोट्या गोष्टींची एक अखंड मालिका आहे, तिच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचे स्वतःचे असे एक स्थान असते. याआधी तुम्हाला या साऱ्याची जाण नसल्यामुळे सर्व गोष्टी तुम्ही नुसत्याच सोडून देत होतात. आता मात्र हा बदललेला दृष्टिकोन तुमच्या चेतनेचे क्षेत्र विस्तीर्ण करतो. जर तुम्ही तुमच्या जीवनातील अर्धा तास दिलात आणि ह्याचा विचार केलात आणि जर तुम्ही स्वतःला हा प्रश्न केलात की, “हे ईश्वरार्पण होते का?” तर तुम्हाला असे आढळेल की, अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा विशाल होतात आणि मग तुम्हाला असे वाटू लागेल की, तुमचे जीवन समृद्ध आणि प्रकाशमान झालेले आहे.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 133)

समर्पण – १८

तपशीलवार समर्पण म्हणजे जीवनाच्या सर्व अंग-उपांगांचे समर्पण. अगदी लहानात लहान गोष्टींचे तसेच दिसताना अगदी किरकोळ वाटतील अशा गोष्टींचेही समर्पण करणे म्हणजे तपशीलवार समर्पण. तपशीलवार समर्पणाचा अर्थ असा की, सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये ईश्वराचे स्मरण ठेवणे; आपण जे काही करतो, अनुभवतो किंवा विचार करतो, त्या साऱ्या गोष्टी त्या ईश्वराच्या सन्निध जाण्याचा एक मार्ग म्हणून त्या ईश्वरासाठीच केल्या पाहिजेत, आपण जे बनावे अशी त्याची इच्छा आहे ते अधिकाधिक बनण्यासाठी, त्याची इच्छा पूर्ण प्रामाणिकपणे आणि विशुद्धतेने आविष्कृत करण्यासाठी आपण सक्षम व्हावे, त्याच्या प्रेमाचे आपण साधन बनावे यासाठीच आपली प्रत्येक कृती, आपली भावना तसेच आपले विचार असले पाहिजेत.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 108)

समर्पण – १७

साधारण अर्पणाकडून तपशीलवार अर्पणाप्रत जाण्यासाठी तुम्हाला पुढील गोष्टी केल्या पाहिजेत. नेहमी ईश्वराच्या अस्तित्वामध्ये जीवन जगा, ते ईश्वरी अस्तित्वच तुमचे संचालन करत आहे आणि तुम्ही जे काही करत आहात ती प्रत्येक गोष्ट त्या ईश्वराकरवीच केली जात आहे याची जाणीव बाळगून जगा. तुमच्या सर्व हालचाली, गतिविधी म्हणजे केवळ मानसिक कृती नव्हे तर, प्रत्येक विचार, प्रत्येक भावना, इतकेच काय पण तुमच्या अगदी सामान्यातिसामान्य, खाण्यापिण्यासारख्या अगदी बाह्य गोष्टीसुद्धा त्या ईश्वरालाच समर्पित करा. उदा. जेव्हा तुम्ही जेवत असता तेव्हा, तुम्हाला असे जाणवले पाहिजे की, तो ईश्वरच तुमच्या माध्यमातून अन्नग्रहण करत आहे. जेव्हा अशा रीतीने तुम्ही तुमच्या सगळ्याच हालचाली ह्या एका अस्तित्वामध्ये एकत्रित कराल, तेव्हाच तुम्ही विभिन्नतेमध्ये जगण्याऐवजी एकात्मतेमध्ये जगू लागाल. तेव्हा मग तुमच्या प्रकृतीमधील एक भाग हा ईश्वराला देऊ केलेला आहे आणि इतर भाग मात्र तसेच सामान्य पद्धतीचे राहिले आहेत, सामान्य कृतींमध्ये निमग्न आहेत असे होणार नाही; तुमचे समग्र जीवनच हाती घेऊन, तुमच्यामध्ये समग्र रूपांतरणास हळूहळू सुरुवात झालेली असेल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 23-24)

समर्पण – १६

एकदा का तुम्ही योगमार्ग स्वीकारलात की, मग तुम्ही जे काही कराल ते पूर्णपणे समर्पण वृत्तीने केले पाहिजे. “मी माझ्यामधील अपूर्णता घालविण्याचे यथाशक्य सर्व प्रयत्न करत आहे, मी माझ्यापरीने सर्वाधिक प्रयत्न करत आहे, मी माझ्यामध्ये सुधारणा व्हावी अशी आस बाळगत आहे आणि त्याच्या फलनिष्पत्तीसाठी मी स्वत:ला पूर्णत: त्या ईश्वराच्या हाती सोपवत आहे;” असा तुमचा भाव असला पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 97)