समर्पण – ४१

सत्त्वगुणाचा धोका तेव्हा असतो जेव्हा साधक त्याच्या तर्कबुद्धीच्या एकांगी निष्कर्षाला चिकटून राहतो, किंवा साधनेच्या एखाद्या विशिष्ट क्रियेला, योगामधील एखाद्या विशिष्ट सिद्धीच्या आनंदाला चिकटून बसतो; कदाचित शुद्धतेच्या जाणिवेशी किंवा कोणतीतरी एखादी विशिष्ट शक्ती प्राप्त झाल्यामुळे किंवा ईश्वराशी संपर्क झाल्याच्या आनंदाशी किंवा मुक्तीच्या जाणिवेशी, मुमुक्षत्वाच्या जाणिवेशी, कोणत्यातरी एकाच गोष्टीशी बद्ध होतो आणि मग त्याला दुसरे काहीच नको असते. हे लक्षात ठेवा की, योग हा तुमच्या स्वतःसाठी नसतो, कारण या गोष्टी, जरी त्या सिद्धीचा एक भाग असला तरीदेखील त्या सिद्धीचे उद्दिष्ट असू शकत नाहीत; कारण ईश्वरावर कोणताही हक्क सांगणार नाही आणि त्याच्याकडून जे काही मिळेल ते मी मुक्तपणे स्वीकारीन असा निश्चय तुम्हीच सुरुवातीला केलेला असतो. आनंदाच्या बाबतीत सांगायचे तर, जर ईश्वराची इच्छा असेल तर निःस्वार्थी जीव हा अगदी ईश्वराच्या उपस्थितीचा आनंददेखील सोडून देईल. तुम्ही सर्वोच्च सात्विक अहंकारापासूनदेखील मुक्त असले पाहिजे; मुक्तीच्या इच्छेपासून, मुमुक्षुत्वाच्या सूक्ष्म अज्ञानापासूनदेखील तुम्ही मुक्त असले पाहिजे आणि सर्व प्रकारचे सुख व आनंद या गोष्टी अनासक्तीने स्वीकारल्या पाहिजेत. तेव्हाच तुम्ही गीतेमधील पूर्ण पुरुष किंवा सिद्ध बनाल.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 85)

श्रीअरविंद