समर्पण – ४०
तमोगुणाचा धोका दुहेरी असतो, प्रथमतः जेव्हा पुरुष त्याच्यामधील तमसाशी स्वतःला एकात्म समजतो आणि असा विचार करू लागतो की, ”मी दुर्बल आहे, पापी आहे, दुःखीकष्टी आहे, अज्ञानी आहे, मी कोणत्याच गोष्टीसाठी लायक नाही, या अमुक माणसापेक्षा मी गौण आहे, त्या तमुक माणसापेक्षा मी गौण आहे, मी अधम आहे, माझ्याद्वारे तो देव तरी काय करणार?” जणू काही जी व्यक्ती देवाचे साधन असते तिच्या क्षमतांमुळे किंवा अक्षमतांमुळे देवावरच मर्यादा पडतात आणि जणू काही, ‘मूकं करोति वाचालम् पंगुम् लंघयते गिरीम्’ हे वचनच खरे नाही. आणि दुसरा धोका हा त्या वेळी उद्भवतो की, जेव्हा साधक नकारार्थी शांतीमधून प्रचंड आराम, एक प्रकारची सुटका अनुभवतो आणि त्याला जणूकाही सर्व त्रासांपासून सुटका झाल्याचा अनुभव येतो आणि ती शांती प्राप्त झाल्यामुळे, तो जीवनाकडे आणि कर्माकडे पाठ फिरवितो आणि त्या शांतीला व निष्क्रियतेच्या सुखाला चिकटून बसतो. हे कायम ध्यानात ठेवा की, तुम्ही सुद्धा ब्रह्म आहात आणि ती दिव्य शक्ती तुमच्या माध्यमातून कार्य करत असते; ईश्वराच्या सर्वसमर्थतेच्या आणि त्याच्या लीलेतील आनंदाच्या साक्षात्काराप्रत जाऊन पोहोचा. लोकसंग्रहार्थ कार्य करण्याची आज्ञा त्याने अर्जुनाला दिली, हे विश्व एकत्र राखावे यासाठी त्याने आज्ञा दिली कारण त्याला हे विश्व पुन्हा प्रकृतीमध्ये बुडून जावे असे वाटत नाही, “जर मी कार्य केले नाही तर या विश्वावर तमोमयतेचे साम्राज्य पसरेल आणि ते प्रकृतीमध्ये बुडून जाईल” यामुळे तो ईश्वर जसे कार्य करत राहतो तसेच तुम्हीही कार्य करत रहावे या गोष्टीवर तो भर देतो. निष्क्रियतेशी बद्ध होऊन राहणे म्हणजे आपल्या कृती या ईश्वराला नव्हे तर, तामसिक अहंकाराला देऊ करणे होय.
– श्रीअरविंद
(CWSA 13 : 84-85)
- साधना, योग आणि रूपांतरण – २५७ - February 19, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २५६ - February 18, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २५५ - February 17, 2025