दिव्यकृपेचा थेट हस्तक्षेप
समर्पण – ३७
दोन शक्यता असतात, पहिली म्हणजे व्यक्तिगत प्रयत्नाच्या आधारे शुद्धिकरण, जिला बराच दीर्घ कालावधी लागतो आणि दुसरी शक्यता म्हणजे दिव्यकृपेचा थेट हस्तक्षेप, साधारणत: हिची क्रिया अधिक जलद असते. ह्या दुसऱ्या शक्यतेसाठी संपूर्ण समर्पणाची आणि आत्मदानाची आवश्यकता असते. आणि त्यासाठीही पुन्हा सर्वसाधारणपणे आवश्यकता असते ती बऱ्यापैकी अचंचल राहू शकेल अशा मनाची. असे मन की जे प्रत्येक पावलागणिक त्या दिव्य शक्तीवर सर्वस्वी निष्ठा ठेवीत, तिला साहाय्यभूत होत, दिव्य शक्तीला तिचे कार्य करू देईल. अन्यथा ते निश्चल आणि शांत राहील. ही दुसरी स्थिती ही श्रीरामकृष्णांनी वर्णिलेल्या मांजराच्या पिल्लाच्या वृत्तीशी साधर्म्य दर्शविते. ती प्राप्त करून घेण्यास कठीण (दुष्प्राप्य) आहे. ज्यांना ज्यांना ते स्वतः जे काही करतात त्यामध्ये, विचार व इच्छा यांची खूप जोरकस हालचाल व क्रिया करण्याची सवय असते, त्यांना मनाची क्रिया स्तब्ध करणे आणि मानसिक पातळीवरील आत्मदानाची अचंचल शांतता आत्मसात करणे, हे खूप कठीण वाटते. ह्याचा अर्थ असा होत नाही की, ते योग करू शकत नाहीत किंवा ते आत्मदानाप्रत येऊ शकत नाहीत, फक्त एवढेच की, शुद्धीकरण आणि आत्मदान ह्या गोष्टी साध्य व्हावयाला त्यांना अधिक कालावधी लागतो, तसेच अशा व्यक्तीकडे सबुरी, अविचल चिकाटी आणि साध्य गाठण्याचा संकल्प असणे आवश्यक असते.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 83)
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – १४ - November 12, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – १३ - November 11, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – १२ - November 10, 2025






