समर्पण – ३६

उद्भवणाऱ्या साऱ्या अडीअडचणी या खुद्द प्रकृतीमध्येच असतील तर, त्यांनी पृष्ठभागावर यावे आणि स्वतःला आविष्कृत करावे हे अटळ आहे. समर्पण ही काही सोपी गोष्ट नाही, त्याला प्रकृतीच्या एका मोठ्या भागाकडून विरोध केला जातो. जर मनाने समर्पणाची इच्छा धरली तर, हे सारे आंतरिक अडथळे येऊन स्वतःचे अस्तित्व दाखविणार हे उघडच आहे; अशा वेळी साधकाने त्यांचे निरीक्षण केले पाहिजे आणि त्यांच्यापासून स्वतःला अलिप्त केले पाहिजे, त्याने त्याच्या प्रकृतीतून या अडथळ्यांना दूर लोटले पाहिजे आणि त्यावर मात केली पाहिजे. याला पुष्कळ काळदेखील लागू शकेल पण हे केलेच पाहिजे. व्यक्तीच्या स्वतःच्या प्रकृतीमध्येच समर्पणाला विरोध असतो आणि या विरोधाची साथ बाह्य अडथळ्यांना मिळते.

या विरोधाची अशी साथ जर त्या बाह्य अडथळ्यांना मिळाली नाही तर मग मात्र ते बाह्य अडथळे आंतरिक समर्पण रोखू शकत नाहीत.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 69)

श्रीअरविंद