समर्पण – ३३

मनाने आपल्या मतांचा, कल्पनांचा, पसंती-नापसंतीचा, प्राणाने त्याच्या इच्छावासनांचा व आवेगांचा, शरीराने त्याच्या सवयीच्या कृतींचा, अहंभावात्मक जीवनाचा आग्रह धरता कामा नये; समर्पणासाठी हे आवश्यक असते कारण अशा प्रकारचे सारे आग्रह हे समर्पणाच्या विरोधी असतात. सर्व प्रकारचे अहंकार आणि स्व-इच्छा यांचा समूळ त्याग केला पाहिजे आणि फक्त दिव्य शक्तीनेच आपले नियंत्रण करावे म्हणून व्यक्तीने प्रयत्नशील असले पाहिजे. चैत्याच्या उमलण्याशिवाय संपूर्ण समर्पण शक्य नाही.

*

समर्पण हे समग्र असले पाहिजे. काहीही हातचे राखून ठेवता कामा नये, कोणती इच्छा नको, कोणतीही मागणी नको, कोणते मत नको, किंवा हे असे असलेच पाहिजे, हे असे असता कामा नये, हे असे असावे किंवा ते तसे नसावे, अशी कोणती कल्पनाही नको… हृदय सर्व इच्छांपासून शुद्ध असले पाहिजे, बुद्धी सर्व प्रकारच्या स्व-इच्छेपासून परिशुद्ध असली पाहिजे, प्रत्येक द्वंद्वाचा त्याग केला पाहिजे, अखिल दृश्य आणि अदृश्य विश्व हे गुप्त प्रज्ञेची, शक्तीची आणि आनंदाची परमोच्च अभिव्यक्ती आहे, हे ओळखता आले पाहिजे आणि दिव्य प्रेम, सामर्थ्य व परिपूर्ण ईश्वरी बुद्धिमत्ता यांना त्यांचे कार्य करता यावे आणि त्यांना ईश्वरी लीलेची परिपूर्ती करता यावी म्हणून वाहनचालकाच्या हाती असलेल्या निष्क्रिय इंजिनाप्रमाणे, समग्र अस्तित्व हे त्यांना देऊ करता आले पाहिजे. ईश्वर आपल्याला जे अंतिमतः प्रदान करू इच्छितो तो परिपूर्ण आनंद आपल्याला मिळावा, ती परिपूर्ण शांती व ज्ञान आपल्याला मिळावे आणि दिव्य जीवनाचे परिपूर्ण आचरण आपल्याला करता यावे म्हणून अहंकाराला हद्दपार केले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 76), (CWSA 13 : 73-74)

श्रीअरविंद