समर्पण – २३

… तुमची इच्छा ही ईश्वरी इच्छेला उधार देऊन, तुम्ही साक्षात्कार अधिक त्वरेने घडवून आणू शकता. हे सुद्धा निराळ्या रूपातील समर्पणच असते. ज्यामुळे तुम्ही एखाद्या ठोकळ्यासारखे बनाल असे निष्क्रिय समर्पण तुमच्याकडून अपेक्षित नाही तर, तुम्ही तुमची इच्छा ही ईश्वरी इच्छेच्या स्वाधीन केली पाहिजे.

तुमच्यामध्ये एक इच्छा असते आणि ती तुम्ही अर्पण करू शकता. तुमच्या रात्रींविषयी जागृत होण्याच्या इच्छेचे उदाहरण घेऊ. जर तुम्ही निष्क्रिय समर्पणाचा दृष्टिकोन स्वीकारलात तर तुम्ही म्हणाल, “मी जेव्हा जागृत बनावे अशी ईश्वराची इच्छा असेल तेव्हा मी जागृत बनेन.”

दुसऱ्या बाजूने, जर तुम्ही तुमची इच्छा ईश्वराला समर्पित कराल तर तुम्ही अशी इच्छा बाळगायला सुरुवात कराल, आणि म्हणाल, “मी माझ्या रात्रींविषयी जागृत होईन.” येथे तुम्ही, असे असे व्हावे अशी इच्छा बाळगता, तुम्ही निष्क्रिय राहून नुसती वाट पाहत बसत नाही. “मी माझी इच्छा ईश्वरार्पण करत आहे. मला माझ्या रात्रींविषयी जागृत बनण्याची उत्कट इच्छा आहे, परंतु मला त्याचे ज्ञान नाही, ईश्वराच्या इच्छेद्वारे ते माझ्यामध्ये घडून यावे.” असा दृष्टिकोन जेव्हा तुम्ही बाळगता त्या वेळी समर्पण घडून येते.

तुमची इच्छा ही स्थिरपणे कार्यरत असली पाहिजे, एखादी विशिष्ट कृती किंवा एखादी विशिष्ट गोष्ट हवी म्हणून नाही तर, तुम्हाला अंतिमतः जे ध्येय साध्य करून घ्यायचे आहे त्यावर तुमची सारी उत्कट अभीप्सा एकवटलेली असली पाहिजे. ही पहिली पायरी. जर तुम्ही दक्ष असाल, जर तुम्ही सावधचित्त असाल तर, तुम्हाला काय केले पाहिजे यासंबंधी प्रेरणा स्वरूपात एखादी गोष्ट निश्चितपणे उमगेल आणि मग मात्र तुम्ही त्या पद्धतीने ती गोष्ट केली पाहिजे.

तुम्ही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे ती अशी की, तुमच्या कृतीचे परिणाम हे तुम्ही ज्याची अपेक्षा केली होती त्यापेक्षा वेगळे देखील असतील; पण त्यांचाही स्वीकार करणे म्हणजे समर्पण!

– श्रीमाताजी
(CWM 03 : 18-19)

श्रीमाताजी