समर्पण –२०

जरी अजून तुम्हाला सदा सर्वकाळ तुमच्या कर्मव्यवहारामध्ये ईश्वराचे स्मरण ठेवता आले नाही, तरी फार काळजी करू नका, त्याने फारसा फरक पडत नाही. कोणतेही कर्म करताना सुरूवातीस ईश्वराचे स्मरण करणे आणि त्याला अर्पण करणे आणि कर्म संपल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करणे हे सद्यस्थितीत पुरेसे आहे. किंवा जर कामाच्या मध्ये थोडा वेळ मिळाला तर तेव्हाही त्याचे स्मरण ठेवणे पुरेसे आहे. जेव्हा लोक काम चालू असताना सदोदित स्मरण राखतात (असे करता येणे शक्य असते) तेव्हा, सहसा ते त्यांच्या मनाच्या पार्श्वभागी असते किंवा त्यांच्यामध्ये हळूहळू दुहेरी विचारांची किंवा दुहेरी चेतनेची एक क्षमता निर्माण झालेली असते – एक चेतना पृष्ठभागी कार्यरत असते आणि दुसरी चेतना ही साक्षी असते आणि स्मरण राखत असते. अभीप्सा आणि कर्म करण्यासाठी महत्तर शक्तीला आवाहन करत, आत्मनिवेदनाचा संकल्प करणे ही अशी पद्धती आहे की ज्यामुळे महान परिणाम घडून येतात. जरी काही जणांना या गोष्टीसाठी बराच वेळ लागत असला तरीदेखील होणारे परिणाम महान असतात. सर्व गोष्टी मनाच्या प्रयासांनीच करण्यापेक्षा, पाठीशी असणाऱ्या किंवा वर असणाऱ्या शक्तीद्वारे कर्म कशी घडवून घ्यायची हे जाणणे, हे साधनेचे महान रहस्य आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 214-215)

श्रीअरविंद