समर्पण – १९
ज्या क्षणी तुम्ही स्वतःला असे विचारू लागता की, “ईश्वराला अर्पण या विचाराने मी ही कृती केली का? ईश्वराला अर्पण करत आहोत अशी माझी भावना होती का?” त्या क्षणापासून जीवनातील प्रत्येक बारकावा आणि प्रत्येक कृती, विचारांचे प्रत्येक स्पंदन, अगदी प्रत्येक संवेदना, भावना जिला एरवी फार महत्त्व दिले गेले नसते ती गोष्ट आता निराळीच बनून जाते. जर तुम्ही तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी याचे स्मरण ठेवू शकाल तर, तुमचा दृष्टिकोन आधी होता त्यापेक्षा पूर्णपणे बदलून जातो. तो अधिक व्यापक होतो. असंख्य छोट्या छोट्या गोष्टींची एक अखंड मालिका आहे, तिच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचे स्वतःचे असे एक स्थान असते. याआधी तुम्हाला या साऱ्याची जाण नसल्यामुळे सर्व गोष्टी तुम्ही नुसत्याच सोडून देत होतात. आता मात्र हा बदललेला दृष्टिकोन तुमच्या चेतनेचे क्षेत्र विस्तीर्ण करतो. जर तुम्ही तुमच्या जीवनातील अर्धा तास दिलात आणि ह्याचा विचार केलात आणि जर तुम्ही स्वतःला हा प्रश्न केलात की, “हे ईश्वरार्पण होते का?” तर तुम्हाला असे आढळेल की, अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा विशाल होतात आणि मग तुम्हाला असे वाटू लागेल की, तुमचे जीवन समृद्ध आणि प्रकाशमान झालेले आहे.
– श्रीमाताजी
(CWM 04 : 133)
- पूर्णयोगाचे ध्येय - September 6, 2024
- अनुभवांकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन - September 5, 2024
- समाधी ही प्रगतीची खूण? - September 4, 2024