समर्पण – १७

साधारण अर्पणाकडून तपशीलवार अर्पणाप्रत जाण्यासाठी तुम्हाला पुढील गोष्टी केल्या पाहिजेत. नेहमी ईश्वराच्या अस्तित्वामध्ये जीवन जगा, ते ईश्वरी अस्तित्वच तुमचे संचालन करत आहे आणि तुम्ही जे काही करत आहात ती प्रत्येक गोष्ट त्या ईश्वराकरवीच केली जात आहे याची जाणीव बाळगून जगा. तुमच्या सर्व हालचाली, गतिविधी म्हणजे केवळ मानसिक कृती नव्हे तर, प्रत्येक विचार, प्रत्येक भावना, इतकेच काय पण तुमच्या अगदी सामान्यातिसामान्य, खाण्यापिण्यासारख्या अगदी बाह्य गोष्टीसुद्धा त्या ईश्वरालाच समर्पित करा. उदा. जेव्हा तुम्ही जेवत असता तेव्हा, तुम्हाला असे जाणवले पाहिजे की, तो ईश्वरच तुमच्या माध्यमातून अन्नग्रहण करत आहे. जेव्हा अशा रीतीने तुम्ही तुमच्या सगळ्याच हालचाली ह्या एका अस्तित्वामध्ये एकत्रित कराल, तेव्हाच तुम्ही विभिन्नतेमध्ये जगण्याऐवजी एकात्मतेमध्ये जगू लागाल. तेव्हा मग तुमच्या प्रकृतीमधील एक भाग हा ईश्वराला देऊ केलेला आहे आणि इतर भाग मात्र तसेच सामान्य पद्धतीचे राहिले आहेत, सामान्य कृतींमध्ये निमग्न आहेत असे होणार नाही; तुमचे समग्र जीवनच हाती घेऊन, तुमच्यामध्ये समग्र रूपांतरणास हळूहळू सुरुवात झालेली असेल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 23-24)

श्रीमाताजी