पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – २४

भक्तियोग

 

पूर्ण आत्मसमर्पणामध्ये आपले सर्व अस्तित्वच ईश्वराला अर्पण करणे अपेक्षित असते; त्यामुळे अर्थातच त्यामध्ये आपले विचार आणि आपली कर्मे यांचे अर्पणही अपेक्षित असते. असे करताना भक्तियोग हा कर्मयोग व ज्ञानयोगाचे महत्त्वाचे घटक अंतर्भूत करून घेतो, पण तो हे स्वतःच्या पद्धतीने व स्वतःच्या विशिष्ट भावाने करतो. येथेही भक्त त्याच्या कर्माचे आणि त्याच्या जीवनाचे ईश्वराला समर्पण करतो; पण ईश्वरी इच्छेशी आपली इच्छा मिळतीजुळती घेण्यापेक्षा, तो आपल्या प्रेमाचे समर्पण करत असतो. भक्त ईश्वराला आपले जीवन अर्पण करतो म्हणजे तो जे काही असतो, त्याच्यापाशी जे काही असते, तो जे काही कर्म करतो ते सर्व तो ईश्वरार्पण करतो. हे आत्मसमर्पण संन्यासाचे रूप घेऊ शकेल. जेव्हा संन्यासी सामान्य मानवी जीवन सोडून देतो आणि त्याचे सारे दिवस हे पूजाअर्चना, भक्ती किंवा ध्यानसमाधीत व्यतीत करतो, तेव्हा त्याची सारी वैयक्तिक मालमत्ता त्यागून, तो बैरागी किंवा भिक्षू बनतो; ईश्वर हीच ज्याची एकमेव अशी संपदा बनते, ईश्वराच्या सायुज्यतेसाठी आणि इतर भक्तांच्या संबंधांपुरते साहाय्यभूत ठरतील किंवा त्याच्याशी जे निगडित असतील अशा कर्मांव्यतिरिक्तच्या सर्व कर्मांचा तो त्याग करतो; किंवा फार फार तर संन्यासाश्रमाच्या सुरक्षित गढीमध्ये राहून, ईश्वरी प्रकृतीचा आविष्कार असणारी प्रेममय, दयामय, कल्याणमय अशी सेवाकर्मे तो करत राहतो. परंतु पूर्णयोगामध्ये, यापेक्षा अधिक व्यापक असे आत्मसमर्पण असू शकते. पूर्णयोगामध्ये जीवन त्याच्या पूर्णतेसह, विश्व त्याच्या समग्रतेसह, ईश्वराची लीला आहे, असे समजून स्वीकारले जाते; असा भक्त हा स्वतःचे समग्र अस्तित्व ईश्वराच्या ताब्यात देतो. सर्व अस्तित्व म्हणजे तो स्वतः जे काही आहे ते आणि त्याची स्वतःची जी काही मालमत्ता आहे ती सारी, ‘त्या ईश्वराची आहे’ असे समजून, (‘इदं न मम’ या भावनेने) स्वतःकडे बाळगतो. त्या गोष्टी स्वतःच्या आहेत, असे तो मानत नाही. तो सारी कर्मे ईश्वरार्पण म्हणूनच करतो. या व्यापक आत्मसमर्पणात आंतरिक व बाह्य जीवनाचे परिपूर्ण सक्रिय समर्पण होत असते; त्यामध्ये कोणतेही न्यून राहात नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 573-574)

श्रीअरविंद