पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ०३
आत्मविलोपन (self-annulment) नव्हे, तर आत्मपरिपूर्णत्व (self-perfection) हेच आपल्या योगाचे उद्दिष्ट आहे.
योग्याला वाटचाल करण्यासाठी दोन मार्ग योजलेले आहेत. एक मार्ग म्हणजे या विश्वापासून सुटका करून घेणे आणि दुसरा मार्ग म्हणजे या विश्वामध्येच परिपूर्णत्व प्राप्त करून घेणे. पहिला मार्ग हा वैराग्याद्वारे येतो आणि दुसरा मार्ग हा तपस्येद्वारे सिद्ध होतो. जेव्हा आपण या जीवनातून ईश्वर गमावतो तेव्हा आपल्याला पहिला मार्ग मिळतो; जेव्हा आपण ईश्वरामध्येच ह्या जीवनाचे परिपूर्णत्व प्राप्त करून घेतो, तेव्हा दुसरा मार्ग साध्य होतो… आपला मार्ग हा परिपूर्णत्वाचा मार्ग असावा, परित्यागाचा नसावा. युद्धामध्ये विजय हे आपले ध्येय असावे, सर्व संघर्षांपासून पलायन हे आपले ध्येय असता कामा नये.
हे जग मूलतः मिथ्या आहे, दुःखी आहे असे बुद्ध आणि शंकराचार्य मानत असत आणि त्यामुळे या जगापासून सुटका हाच त्यांच्या दृष्टीने एकमेव विवेक होता. परंतु हे विश्व म्हणजे ब्रह्म आहे, हे विश्व म्हणजे देव आहे, हे विश्व म्हणजे सत्य आहे, हे विश्व म्हणजे आनंद आहे. आपल्या मानसिक अहंकाराच्या माध्यमातून या विश्वाचे चुकीचे आकलन झाल्याने, आपल्याला विश्व मिथ्या वाटू लागते आणि या विश्वामध्ये देवाशी असणारे आपले नाते चुकीच्या पद्धतीने निर्माण झाल्याने, हे विश्व म्हणजे दु:खभोग आहे असे आपल्याला वाटू लागते. परंतु असे वाटणे यासारखे दुसरे कोणतेही मिथ्यत्व नाही आणि यासारखे दुःखाचे दुसरे कोणते कारणही नाही.
*
आपण भेदाच्या जागी ऐक्य, अहंकाराच्या जागी दिव्य चेतना, अज्ञानाच्या जागी दिव्य प्रज्ञा, विचारांच्या जागी दिव्य ज्ञान आणि दुर्बलता, संघर्ष आणि प्रयास यांच्या जागी आत्मतृप्त दिव्य शक्ती प्रस्थापित करायला हवी. दुःखभोग व खोटी मौजमजा यांच्या जागी दिव्य आनंद प्रस्थापित करायला हवा.
– श्रीअरविंद
(CWSA 12 : 96,101)
- साधना, योग आणि रूपांतरण – २५५ - February 17, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २५४ - February 16, 2025
- प्राणाचे रूपांतरण – प्रास्ताविक - February 14, 2025